राजधानी दिल्लीकडे आज जगाचं लक्ष लागलं आहे. कारण आजपासून G 20 परिषदेला सुरुवात होणार आहे. जगभरातील महत्वाचे आज दिल्लीत आहेत. या G 20 परिषदेला थोड्याच वेळा सुरुवात होणार आहे. G 20 च्या भारत मंडपमध्ये विविध देशांचे अधिकारी यायला सुरुवात झाली आहे. थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रगती मैदानावरच्या भारत मंडपामध्ये दाखल होणार आहेत. त्यानंतर इतर राष्ट्रांचे प्रमुखही दाखल होतील. साडेदहा वाजल्यापासून पहिलं सत्र सुरू होणार आहे. कसा असेल आज आणि उद्याचा कार्यक्रम? या G 20 परिषदेची उद्दिष्ट्ये काय आहेत? जाणून घ्या…
आज काय घडणार?
आजपासून सुरु होणाऱ्या या परिषदेची सुरुवात आज सकाळी साडे नऊ वाजता होईल. ट्रीट ऑफ फायरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोटोसेशन पार पडले. साडेदहा वाजता मुख्य परिषदेची सुरुवात होईल. या परिषदेसाठी तयार करण्यात आलेल्या खास भारतमंडपात पंतप्रधान मोदींसह इतर राष्ट्रांचे प्रमुख दाखल होतील. समिट हॉलमध्ये वन अर्थवर पहिलं सत्र पार पडेल. त्यानंतर जेवणासाठी ब्रेक होईल.
दुपारी दीड वाजता द्विपक्षीय भेटीगाठी होतीस. या अनौपचारिक तसंच औपचारिक बैठका असतील. तर दुपारी तीन वाजता समिट हॉलमध्ये वन फॅमिलीवर दुसरं सत्र सुरु होईल. इथं जगभरातील सर्व देश कसे एकाच कुटुंबाचे भाग आहेत. सर्वांनी एकमेकांना सहकार्य करत पुढे गेलं पाहिजे यावर चर्चा होईल. संध्याकाळी सात वाजता हे सगळे नेते आपआपल्या हॉटेल्समध्ये दाखल होतील. जेवणावेळी आठ वाजता विविध नेते एकत्र येत चर्चा करू शकतील. रात्री साडे नऊ वाजता लाउंजमध्ये हे नेते येतील. नंतर पुन्हा आपल्या हॉटेल्समध्ये पोहोचतील. त्यानंतर आजचा कार्यक्रम संपेल.
उद्याचा दिनक्रम कसा असेल?
उद्या सकाळी 8. 15 ला हे सगळे नेते राजघाटावर जातील. यावेळी ते पीस वॉलवर सह्या करतील. नऊ वाजता महात्मा गांधी यांच्या समाधीवर श्रद्धासुमन अर्पण करतील. इथं भक्ती गीतांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. साडे नऊ वाजता हे नेते भारत मंडपात दाखल होतील. सव्वा दहा वाजता साऊथ प्लाझामध्ये वृक्षारोपण होईल. साडे दहा वाजता भारतमंडपात वन फ्यूचरवर तिसरं सत्र पार पडेल. दुपारी साडे बारा वाजता द्विपक्षीय चर्चा होईल. नंतर हे नेते आपआपल्या देशात परतण्यासाठी निघतील.