Wednesday, November 11, 2026
Homeमुख्यबातम्याअवैध वृक्षतोडीच्या निषेधार्थ ‘वृक्ष अंत्ययात्रा’; आप युवा आघाडी आक्रमक

अवैध वृक्षतोडीच्या निषेधार्थ ‘वृक्ष अंत्ययात्रा’; आप युवा आघाडी आक्रमक

दोषी बिल्डर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी; कारवाई न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

पिंपरी, प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मुख्यालयाशेजारी झालेल्या कथित बेकायदेशीर वृक्षतोडीच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीच्या पिंपरी-चिंचवड शहर शाखा आणि महाराष्ट्र राज्य युवक आघाडीच्या वतीने गुरुवारी (दि. २२ ऑक्टोबर) ‘वृक्ष अंत्ययात्रा’ आंदोलन करण्यात आले. जुन्या वृक्षांची कत्तल, पर्यावरणाचा ऱ्हास आणि या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यास होत असलेल्या कथित दिरंगाईच्या निषेधार्थ आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला जाब विचारला. संबंधित बांधकाम व्यावसायिक आणि दोषी अधिकाऱ्यांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

महापालिका मुख्यालयाशेजारील बांधकाम प्रकल्पासाठी ५२ पेक्षा अधिक जुन्या वृक्षांची संख्या आणि वय कागदपत्रांमध्ये कमी दाखवून बेकायदेशीर वृक्षतोड करण्यात आल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. तसेच, बांधकाम व्यावसायिकाला आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी वृक्ष प्राधिकरणाच्या मूळ अहवालात फेरफार करण्यात आल्याचाही आरोप पक्षाने केला आहे. या प्रकरणात उद्यान अधीक्षक महेश गारगोटे आणि राजेश वसावे यांच्या भूमिकेची चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

बांधकाम परवानगी रद्द करण्याची मागणी

कथित बेकायदेशीर वृक्षतोडीप्रकरणी सुखवानी असोसिएट्स या बांधकाम व्यावसायिकासह संबंधित अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली. दिशाभूल करून मिळविल्याचा आरोप असलेली बांधकाम परवानगी रद्द करावी, तसेच नियमानुसार १,०१८ झाडे लावण्याच्या तरतुदीच्या अनुषंगाने प्रति वृक्ष १५ हजार रुपये याप्रमाणे सुमारे १ कोटी ५२ लाख ७० हजार रुपयांची रक्कम वसूल करावी, अशी मागणीही आप युवा आघाडीने केली.

‘पर्यावरणाची हानी करणाऱ्यांना वाचवू नका’

शहराचा पर्यावरणीय समतोल राखणाऱ्या जुन्या वृक्षांची कत्तल होत असताना संबंधित यंत्रणा नेमकी काय करत होती, असा सवाल आप युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रविराज काळे यांनी उपस्थित केला. वृक्षतोडीच्या प्रकरणात गंभीर अनियमितता झाल्याचे आरोप समोर येऊनही ठोस कारवाई होत नसल्याने जबाबदार अधिकाऱ्यांना कोणाचे अभय आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे. बांधकाम व्यावसायिक कितीही मोठा असला, तरी तो कायद्यापेक्षा मोठा नाही. कागदपत्रांमध्ये फेरफार करून पर्यावरणाची हानी केली असेल, तर संबंधितांना वाचवण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असे काळे यांनी स्पष्ट केले.

कारवाई न झाल्यास आंदोलन तीव्र करणार

महापालिका प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास हे प्रकरण आणून दिल्यानंतरही अपेक्षित कारवाई झाली नसल्याचा आरोप आप युवा आघाडीने केला. हा प्रश्न केवळ वृक्षतोडीपुरता मर्यादित नसून शहराच्या पर्यावरणाचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेच्या उत्तरदायित्वाशी संबंधित असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

या प्रकरणातील आरोपांची निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणावे आणि दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करावी. अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा आप युवा आघाडीच्या वतीने देण्यात आला.

या आंदोलनावेळी आम आदमी पार्टीचे सचिव अभिजीत मोरे, समन्वयक अमित मस्के, कामगार आघाडीचे संघटक संजय कोणे, युवक प्रदेश उपाध्यक्ष ऋषिकेश कानवटे, शहराध्यक्ष वैजनाथ शिरसाट, पुणे शहराध्यक्ष धनंजय बनकर, युवक शहराध्यक्ष विकी पासोटे यांच्यासह सुरेश गायकवाड, अंकुश लांडगे, यशवंत कांबळे, लक्ष्मण माने, सुप्रिया गायकवाड, अजय सिंग, शुभम यादव, सुरेश बावनकर, सुभाष कारंडे, कुणाल गोरडे, राहुल मुदनोर, राहुल मदने, सुनिता काळे, कविता कोंडे, गौतम अडसूळ, अंकुश डोंगरे, गौतम तायडे, अखिल शेख, अंगद मुद्दे आणि सुरज झिटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments