पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या पेन्शन योजना शुभारंभ समारंभात आयुक्त शेखर सिंह यांचे प्रतिपादन
पत्रकार हा नेहमी अग्रभागी असतो परंतु त्याला आवश्यक योग्य ते सहाय्य मिळत नाही हे कोविडच्या काळात दिसून आले. कोविड काळात अग्रभागी राहून काम करणाऱ्या पत्रकारांना योग्य ते उपचार मिळावेत यासाठी मी प्रयत्न केले अशा पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर प्रमाणे सहाय्याची आवश्यकता आहे असे मत पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले.
मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पिंपरी चिंचवड पत्रकार संघाने वय वर्षे साठ वरील पत्रकारांना दरमहा 5000 रुपयांच्या पेन्शन योजनेचा शुभारंभ आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते आज येथे केला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब ढसाळ हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून लोकमतचे निवासी संपादक हणमंत पाटील, पुढारीचे निवासी संपादक किरण जोशी, मराठी पत्रकार परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक गोविंद वाकडे, मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव नाना कांबळे, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण शिर्के, डिजिटल मीडियाचे अध्यक्ष प्रशांत साळुंखे, पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष अविनाश आदक, डिजिटल मीडियाचे कार्याध्यक्ष राजू वारभुवन, महिला पत्रकार आघाडीच्या अध्यक्ष अर्चना मेंगडे, उपाध्यक्ष गणेश मोरे, पत्रकार भवन समितीचे निमंत्रण गोपाळ मोटघरे, प्रशिक्षण वर्ग समितीचे निमंत्रक मारुती बाणेवार, महिला उपाध्यक्ष सीता जगताप, पत्रकार संघाचे खजिनदार राम बनसोडे, समन्वयक राकेश पगारे, सहचिटणीस गौरव साळुंखे, अशोक पगारे, पत्रकार हल्ला कृती समितीचे अनिल भालेराव, अविनाश कांबीकर आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना आयुक्त म्हणाले की पिंपरीकर संघाने पेन्शन योजनेचा घेतलेला निर्णय अतिशय धाडसी व कौतुकास्पद आहे पत्रकार संघ चांगले काम करत असल्याचे आपण पाहतो आहोत संघाला चांगले सहकार्य करण्याचे माझे प्रयत्न असतील पिंपरी चिंचवड शहरात पत्रकार भवन लवकरात लवकर पूर्ण व्हावे म्हणून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येणार असल्याचे सांगून पत्रकार संघाला महाविद्यालयासाठी इमारत उपलब्ध करून देण्याबाबतही त्यांनी आश्वासन दिले. पत्रकार हाउसिंग सोसायटी साठी पीएमआरडीए च्या आयुक्तांबरोबर चर्चा करू असे आश्वासनही आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी दिले.
पुढारीचे निवासी संपादक किरण जोशी यावेळी बोलताना म्हणाले की पत्रकार संघाच्या योजना खूप कौतुकास्पद आहेत या योजना कार्यान्वित व्हाव्यात याकरिता आपण पाठपुरावा करू. लोकमतचे निवासी संपादक हणमंत पाटील यांनी यावेळी बोलताना पत्रकार संघ खूप चांगले काम पहात आहे मी स्वतः जी मदत हवी ती करण्यास तयार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात बोलताना विभागीय सचिव नाना कांबळे म्हणाले की, पिंपरी चिंचवड पत्रकार संघ लवकरच रेड स्वस्तिक सोसायटी बरोबर पत्रकारांच्या आरोग्यविषयक उपचाराबाबतचा करार करत आहे. रेड स्वस्तिक सोसायटी मार्फत शहरातील पत्रकारांना सर्व मोठ्या हॉस्पिटलमध्ये संपूर्ण मोफत उपचार करण्यासंदर्भात सहकार्य करण्यात येणार आहे यामुळे लाखो रुपयांचे उपचार देखील संपूर्ण मोफत मिळू शकणार आहेत. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत या पेन्शन योजनेच्या शुभारंभाचा कार्यक्रम घेत असल्याचे सांगत पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या उपक्रमांना आयुक्त शेखर सिंह यांनी आवश्यक ते सहकार्य करावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब ढसाळ यांनी पत्रकारांना पेन्शन योजनेसारख्या अशा सहकार्याची का आवश्यकता आहे हे विशद करत अशा योजनेसाठी पत्रकार संघाच्या वतीने स्वतंत्र विश्वस्त संस्था निर्माण करून हा उपक्रम कायमस्वरूपी राबविला जावा यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले या कार्यक्रमात उपस्थित त्यांचे स्वागत व आभार प्रदर्शन पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण शिर्के यांनी केले.