Friday, September 29, 2023
Homeताजी बातमी११ एप्रिल ते १५ एप्रिल या कालावधीत क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि...

११ एप्रिल ते १५ एप्रिल या कालावधीत क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती प्रबोधन पर्व कार्यक्रम पार पडणार

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले असून पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या शेजारील मैदानात दि. ११ एप्रिल ते १५ एप्रिल या कालावधीत विविध सांस्कृतिक प्रबोधनात्मक कार्यक्रम, चर्चासत्र, परिसंवाद, शाहिरी जलसे, प्रबोधन कार्यक्रम, प्लॉगेथॉन मोहिम, समता सायकल रॅली संपन्न होणार आहे. नागरिकांनी या प्रबोधन पर्वात सहभाग घेऊन महापुरुषांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी आपले योगदान द्यावे असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी केले.

या प्रबोधन पर्वात दि. १३ एप्रिल रोजी समता सायकल रॅली द्वारे महापुरुषांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यात येणार असून १४ एप्रिल रोजी सकाळी ६ ते ९ यावेळेत सर्व प्रभागामध्ये कचरा संकलन करण्यासाठी प्लॉगेथॉन मोहिम राबवून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखे अभिवादन करण्यात येणार आहे. दि. ११ एप्रिल ते १५ एप्रिल दरम्यान पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे बेरोजगार युवक युवतींसाठी स्वयंरोजगार व उद्योजकता प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले असून १५ एप्रिल रोजी रोजगार मेळावा घेण्यात येणार आहे. पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामागील परिसरात पुस्तक नगरी तयार करण्यात आली असून दि. १४ एप्रिल रोजी या ठिकाणी विविध पुस्तक प्रकाशन संस्थांनी पुस्तकांचे स्टॉल्स लावावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

सोमवार दि. ११ एप्रिल रोजी महात्मा फुले जयंतीदिनी विचार प्रबोधनपर्वास सुरुवात होणार आहे. सकाळी ६.३० वाजता महापालिका कर्मचारीवृंदांकडून “भीमज्योती पहाट” कार्यक्रमाद्वारे महामानवांना संगीतमय अभिवादन करण्यात येणार आहे. सकाळी ८.३० वाजता स्थानिक कलाकारांचा कार्यक्रम होईल. सकाळी १० वाजता प्रबोधन पर्वाचे उद्घाटन होणार आहे. यानंतर सकाळी १०.३० वाजता शेखर गायकवाड यांच्या गीत गायनाचा कार्यक्रम होईल. तसेच दुपारी १२ वाजता सुनिल गायकवाड यांच्या प्रबोधनपर गीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच दुपारी १.३० वाजता गीत गायन सादरकर्ते विनोद फुलमाळी यांचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी ३ वाजता सिध्दार्थ भोसले यांचा ‘भटक्या विमुक्तांचा जयभीम एल्गार’ हा संगीतमय कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ४.३० वाजता ‘माध्यमांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि भारतीय संविधान’ या विषयावर परिसंवाद होणार असून यामध्ये कवी तथा सिने कलाकार रामदास फुटाणे, अभिनेते किरण माने, कवी तथा अभिनेते सौमित्र उर्फ किशोर कदम, साहित्यिक प्रा. डॉ. सुभाष वाघमारे सहभागी होणार आहेत. सायंकाळी ६.३० वाजता ख्यातनाम गायक मुकुंद ओव्हाळ यांचा प्रबोधनात्मक गीतांचा कार्यक्रम होणार आहे. रात्री ८ वाजता पैस रंगमंच प्रस्तुत ‘क्रांतिसूर्य ते महासूर्य – एका संगराचा प्रवास’ हा नाट्यमय सांगितीक अभिवादनाचा कार्यक्रम होणार आहे.

मंगळवार दि. १२ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता स्थानिक कलाकार महामानवांना गीत गायनातून वंदन करतील. सकाळी ९ वाजता शाहीर सुरेश सूर्यवंशी आसंगीकर यांच्या ‘पोवाड्यांचा कार्यक्रम’ होईल तर सकाळी १० वाजता सूर सरगम सुराली हा अंध कलाकारांचा कार्यक्रम होईल. ११ वाजता अस्तित्व संस्था ठाणे, उन्मुक्त कलाविष्कार प्रस्तुत ‘अंधे जहाँ के रास्ते’ हे दोन अंकी मराठी नाटक सादर होणार आहे. दुपारी १ वाजता विशाल ओव्हाळ यांचा तर २.३० वाजता बापू पवार यांचा पोवाड्यांचा कार्यक्रम तर ३.३० वाजता यवतमाळचे आकाशराजा गोसावी यांचा गीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी ४ वाजता कवी संमेलन होणार असून यामध्ये दंगलकार नितिन चंदनशिवे, सुमित गुणवंत, बबन सरवदे, सागर काकडे आणि समाधान गायकवाड सहभागी होणार आहेत. सायंकाळी ६ वाजता साधना मेश्राम यांचा प्रबोधनात्मक गीत गायनाचा कार्यक्रम होईल. रात्री ८ वाजता सुप्रसिध्द महागायक प्रकाशनाथ पाटणकर यांच्या गीतांचा कार्यक्रम होणार आहे.

बुधवार दि. १३ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता विद्रोही भीमशाहीर मधुकर कदम यांचा शाहिरी जलसा होईल तर सकाळी ८ वाजता अमर पुणेकर, चित्रसेन भवार आणि मंजुषा शिंदे यांचा सहभाग असलेली ‘भीमगीतांची सोनेरी मैफिल’ हा कार्यक्रम होणार आहे. सकाळी १० वाजता संतोष जोंधळे यांचा भिम गीतांचा कार्यक्रम होईल. सकाळी ११.३० वाजता भीमशाहीर मेघानंद जाधव प्रस्तुत ‘परिवर्तनाचा वादळवारा’ हा प्रबोधनात्मक गीतगायनाचा कार्यक्रम होणार आहे. यानंतर धीरज वानखेडे दुपारी १ वाजता तर दुपारी २.३० वाजता डॉ. गणेश चंदनशिवे, अजय देहाडे आणि चेतन चोपडे प्रस्तुत ‘तुफानातील दिवे’ हा भीमगीतांचा महाजलसा सादर होईल. सायंकाळी ४.३० वाजता ‘भारतीय संविधानाचे भवितव्य’ या विषयावर चर्चासत्र होणार आहे. यामध्ये लंडनहून यु.एस.बहल तर अमेरिकेतून अजय जलवान आणि दिल्लीहून डॉ. उदय वीरसिंग, छत्तीसगढहून राजेंद्र गायकवाड ऑनलाईन सहभागी होणार आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयाचे अॅड.अभिषेक राज, यवतमाळचे जिल्हा उपनिबंधक रमेश कटके, चळवळीचे अभ्यासक गोविंद दळवी या चर्चासत्रात सहभागी होतील. अॅड.गोरक्ष लोखंडे चर्चासत्राचे सूत्रसंचालन करतील. सायंकाळी ६.३० वाजता संगीत विशारद संतोष गायकवाड गीत गायनाचा कार्यक्रम सादर करतील. रात्री ८ वाजता शाहीर प्रबोधन मंच प्रस्तुत सुनिता कीर्तने आणि मिलींद घोगरे यांच्या भीमगीतांचा कार्यक्रम होणार आहे. रात्री ९ वाजता कबीर नाईकनवरे यांचा ‘सलाम संविधान’ हा प्रबोधनात्मक गीतांचा कार्यक्रम होईल.

गुरुवार दि. १४ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता अमोल जाधव आणि सहकारी, औरंगाबाद यांचा बुध्द भीमगीतांची परिवर्तनवादी मैफिल अर्थात निळी पहाट हा कार्यक्रम होणार आहे. सकाळी ८ वाजता रुपेश निकाळजे यांचा ‘क्रांतीचा साक्षीदार’ हा एकपात्री नाट्यप्रयोग होईल. सकाळी ९.३० वाजता भारतीय बौध्द महासभा यांच्या संयोजनाने वंदना आणि समता सैनिक दलाची मानवंदना होईल. यावेळी आदिवासी तारपा कलानृत्यातून महामानवांना अभिवादन देखील केले जाणार आहे. सकाळी १०.३० वाजता ज्येष्ठ गायिका वैशाली शिंदे यांना पुरस्कार आणि मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यानंतर त्यांच्या गीतगायनाचा कार्यक्रम होईल. दुपारी १२ वाजता ज्येष्ठ कवी गायक प्रतापसिंग बोदडे, कुणाल बोदडे आणि सारेगमप फेम अॅड. रागिणी बोदडे यांच्या महागीतांचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी २.३० वाजता प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचे शिष्य इंजि. पवन दवंडे प्रस्तुत सप्तखंजेरीतून प्रबोधनाचा कार्यक्रम होईल. सायंकाळी ४ वाजता प्रकाशदिप वानखेडे यांचा ‘संविधानाचा आलाप’ हा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ६ वाजता कुणाल वराळे आणि राधा खुडे प्रस्तुत गाथा युगपुरुषांची हा कार्यक्रम होईल. रात्री ८ वाजता कोसंबी बंधू कोल्हापूर यांचा ‘जयभीमचा नारा’ हा संगीतमय कार्यक्रम सादर होणार आहे. यामध्ये सुप्रसिध्द गायक अभिजीत कोसंबी, प्रसेनजीत कोसंबी, गायिका कविता राम आणि निवेदक प्रा. डॉ. सत्यजित कोसंबी यांचा सहभाग असेल.

शुक्रवार दि. १५ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता सुधाकर वारभुवन आणि मारुती जकाते यांचा गीतगायनाचा कार्यक्रम होईल. सकाळी ७.३० वाजता लेणी अभ्यासक सागर कांबळे ‘लेणी संवर्धन’ या विषयावर व्याख्यान देतील. सकाळी ८.३० वाजता म्युझिक मेकर्स प्रस्तुत एम.एम. शेख, कैलास शिंदे आणि सुमेध कल्हाळीकर यांच्या गीतांचा कार्यक्रम होईल. सकाळी १० वाजता गायक स्वप्निल पवार, निशांत गायकवाड, रोमियो कांबळे आणि मुन्ना भालेराव यांच्या गीतांचा कार्यक्रम होईल. सकाळी ११.१५ वाजता स्पर्धा परिक्षेत यश संपादन करणा-या शहरातील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. सकाळी ११.३० वाजता सारेगमप फेम राहुल भोसले, मुंबई यांच्या गीत गायनाचा कार्यक्रम ‘भीम स्वर गंधार’ हा कार्यक्रम संपन्न होईल. दुपारी १ वाजता प्रविण येवले प्रस्तुत भीमाचा किल्ला हा संगीतमय कार्यक्रम होणार आहे. दुपारी २.३० वाजता संगीत विशारद सुप्रसिध्द गायिका प्रज्ञा इंगळे यांचा तर ४ वाजता गायक संकल्प गोळे प्रस्तुत ‘संकल्प भीमरायाचा’ हा कार्यक्रम होईल. सायंकाळी ७ वाजता लांडगे सिस्टर, बेंजो वादक अविनाश लांडगे आणि ढोलकीपटू संतोष घाडगे यांचा म्युझिकल फ्युजनचा कार्यक्रम होईल. सायंकाळी ८ वाजता ज्येष्ठ गायक मनोहर अजमेरी यांच्या गायनाने प्रबोधन पर्वाची सांगता होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments