Monday, July 14, 2025
Homeताजी बातमीइयत्ता १० वी १२ वी उत्तीर्ण मुलींसाठी मोफत पदविका अभ्यासक्रम

इयत्ता १० वी १२ वी उत्तीर्ण मुलींसाठी मोफत पदविका अभ्यासक्रम

महापालिका क्षेत्रातील इयत्ता १० वी आणि १२ वी उत्तीर्ण मुलींसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने मोफत, निवासी व रोजगाराभिमुख पदविका अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले असून आर्थिक दुर्बल कुटुंबातील विद्यार्थिनींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी केले आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका आणि मे. सिंबॉयसीस स्किल्स आणि प्रोफेशनल युनिवर्सिटी, किवळे यांच्या संयुक्त विद्यमाने डिप्लोमा इन मॅन्यूफॅक्चरिंग एक्सलंस आणि डिप्लोमा इन मॅन्यूफॅक्चरिंग अॅटोमेशन हे अभ्यासक्रम विद्यार्थिनींना मोफत स्वरुपात उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या अभ्यासक्रच्या २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून या अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जुलै आहे.

मनपा हद्दीतील १० वी उत्तीर्ण आणि १२ वी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झालेल्या मुलींना महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा महत्वकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. १० वी उत्तीर्ण मुलींसाठी डिप्लोमा इन मॅन्यूफॅक्चरिंग एक्सलंस हा २ वर्षाचा निवासी अभ्यासक्रम आहे. यासाठी आर्थिक दुर्बल कुटुंबातील १६ ते २१ वयोगटातील मुली अर्ज करू शकतात. डिप्लोमा इन मॅन्यूफॅक्चरिंग अॅटोमेशन या अभ्यासक्रमासाठी १२ वी विज्ञान शाखेतून भौतिकशास्त्र (फिजिक्स) , रसायनशास्त्र (केमिस्ट्री), गणित (मॅथेमॅटीक्स) हे विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनी अर्ज करू शकतात. या अभ्यासक्रमाचा कालावधी २ वर्ष असून आर्थिक दुर्बल कुटुंबातील १८ ते २१ वयोगटातील विद्यार्थिनी या अभ्यासक्रमास पात्र असतील.

डिप्लोमा इन मॅन्यूफॅक्चरिंग एक्सलंस या अभ्यासक्रमासाठी ३० आणि डिप्लोमा इन मॅन्यूफॅक्चरिंग अॅटोमेशन या अभ्यासक्रमासाठी ३० अशा एकूण ६० जागा उपलब्ध असून प्रवर्गानुसार जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. हे दोन्हीही अभ्यासक्रम मोफत आणि निवासी असून यासाठी विद्यार्थ्यांना कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील यांनी दिली.

या अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी मे. सिंबॉयसीस स्किल्स आणि प्रोफेशनल युनिवर्सिटी, किवळे यांच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्रवेश अर्ज डाउनलोड करा. भरलेला अर्ज आवश्यक कागदपत्रे जोडून, स्कॅन करून diploma@sspu.ac.in या ईमेलवर दिनांक १५ जुलै पर्यंत पाठवावे. त्यानंतर विद्यापीठाकडून प्रवेशपरीक्षा आणि मुलाखतीसाठी संपर्क केला जाईल. त्यानंतर गुणवत्तायादी जाहीर करण्यात येईल, अशी माहिती समाज विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे यांनी दिली. तसेच अधिक माहितीसाठी मे. सिंबॉयसीस स्किल्स आणि प्रोफेशनल युनिवर्सिटी, किवळे यांना ७८२३८९३८६६, ७४९८२२५२३७ या संपर्क क्रमांकावर संपर्क करावा, अथवा महापालिकेच्या समाज विकास विभागाशी ०२०-६७३३१५२९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही ते म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments