Tuesday, July 16, 2024
Homeताजी बातमीपिंपरी-चिंचवडमधील शालेय विद्यार्थ्यांना पीएमआरडीए आणि कॅन्टोन्मेंट हद्दीसाठी पीएमपीएमएलचे मोफत बस पास...

पिंपरी-चिंचवडमधील शालेय विद्यार्थ्यांना पीएमआरडीए आणि कॅन्टोन्मेंट हद्दीसाठी पीएमपीएमएलचे मोफत बस पास द्या

शहरातील महापालिका व खासगी शाळांमधील सर्व शालेय विद्यार्थ्यांना पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिका तसेच पीएमआरडीए आणि कॅन्टोन्मेंट हद्दीसाठी पीएमपीएमएलचे शैक्षणिक मोफत बसपास उपलब्ध करून द्यावेत. पुणे महापालिकेमार्फत पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरात जाण्यासाठी शालेय विध्यार्थ्यांना मोफत बस पास दिले जात आहेत. मात्र पिंपरी-चिंचवड महापालिका केवळ आपल्या हद्दीतच प्रवासासाठी विद्यार्थ्यांना काही शुल्क आकारून बस पास उपलब्ध करून देत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने विद्यार्थ्यांसोबतचा हा दुजाभाव थांबवावा, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी आयुक्त शेखर सिंह यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत शहरातील महिला व बालकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. या कल्याणकारी योजनांच्या अंतर्गत शहरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी पीएमपीएमएलचे मोफत बसपास उपलब्ध करून देणे शक्य आहे. महापालिका शाळांसह शहरातील विविध ठिकाणाच्या खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी वर्षाला हजारो रुपये मोजावे लागत आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेने शालेय विद्यार्थ्यांसाठी पीएमपीएमएल बसमध्ये मोफत प्रवासाची सोय उपलब्ध करून दिल्यास शहरातील हजारो सर्वसामान्य कुटुंबांना मोठा आधार मिळेल. शालेय विद्यार्थ्यांना पीएमपीएमएलमधून मोफत प्रवास करण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिल्यास शहरातील वाहतुकीवरचा ताणही कमी होऊ शकेल. अनेक विद्यार्थी रिक्षा, स्कूल बस यांसारख्या वाहनांमधून रोज शाळेत ये-जा करत असतात. त्यामुळे शाळांच्या वेळेत शहरातील रस्त्यांवर दररोज वाहतूक कोंडी निदर्शनास येते.

पुणे महापालिकेमार्फत पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरात ये-जा करण्यासाठी शालेय विध्यार्थ्यांना मोफत बस पास दिले जात आहेत. त्याउलट पिंपरी-चिंचवड महापालिका केवळ आपल्या हद्दीतच पीएमपीएमएल बसने प्रवास करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना काही शुल्क आकारून बस पास उपलब्ध करून देत आहे. त्याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने १० जून २०२४ रोजी पीएमपीएमएलला दिलेल्या पत्रात विद्यार्थ्यांना बस पास देण्याकरिता काही अटी व शर्तींचा उल्लेख केलेला आहे. त्यातील चार क्रमांकाची अट शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या बस पासच्या सवलतीबाबत भेदभाव करणारी आहे. या अटीमध्ये असे म्हटले आहे की, “मनपा हद्दीतील मनपाच्या सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच खासगी मान्यताप्राप्त शाळांमधील इयत्ता ५ वी ते इयत्ता १० वी पर्यंतच्याच विद्यार्थ्यांना ही योजना लागू राहील. मनपा हद्दीबाहेरील शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना बसपास दिल्यास त्याचे बिल मनपाकडून अदा केले जाणार नाही.”

पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील शालेय विध्यार्थ्यांना पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महानगरपालिका हद्दीसह पीएमआरडीए व कॅन्टोमेंट परिसरातील शासकीय आणि खासगी शाळांमध्ये शिक्षण घेण्यासाठी पीएमपीएमएलचे मोफत बसपास उपलब्ध करून द्यावेत. याबाबत महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत तातडीने प्रस्तावाला मंजुरी द्यावी. या प्रस्तावाची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याबाबत पीएमपीएमएल प्रशासनाला निर्देश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.”

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments