Saturday, March 22, 2025
Homeअर्थविश्वआयुर्वेदिक तेलाच्या खरेदी-विक्रीच्या गुंतवणुकीच्या आमिषाने ५० लाखांची फसवणूक

आयुर्वेदिक तेलाच्या खरेदी-विक्रीच्या गुंतवणुकीच्या आमिषाने ५० लाखांची फसवणूक

आयुर्वेदिक तेलाच्या खरेदी-विक्रीच्या व्यवसायातून मोठा नफा मिळवून देण्याच्या आमिषाने वृद्धाची सायबर चोरट्यांनी ४९ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. फसवणूक झालेली व्यक्ती एका ऑइल कंपनीतून सेवानिवृत्त झाली आहे.

या प्रकरणी विमानगर येथील ७१ वर्षीय व्यक्तीने विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून सना टिन्ता, मार्टीन पार्टीव्ह नावाच्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २०२०पासून आजपर्यंतच्या कालावधीत घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी सोशल मीडियावर ‘लाम मेअर नॅच्युरल ऑइल’ या तेलाच्या व्यवसायाची जाहिरात पाहिली होती. त्यानुसार त्यांनी आरोपींना संपर्क साधून व्यवसायाची माहिती घेतली. आरोपींनी ते अमेरिकेतून बोलत असल्याचे भासवून ‘या तेलाला अमेरिकेत मोठी मागणी आहे. या व्यवसायातून मोठा नफा मिळू शकेल,’ असे तक्रारदाराला सांगितले. तसेच, आरोपींनी ‘आम्हाला हे तेल विदेशात निर्यात करता येत नाही. त्यामुळे तुम्ही तेलाची खरेदी करा,’ असे सांगितले आणि तक्रारदाराकडून तेल खरेदीसाठी २५ लाख रुपये घेतले.

मात्र, त्यानंतर कोणत्याही प्रकारचे तेल पाठवले नाही. तक्रारदाराने संबंधितांकडे चौकशी केली असता, ‘तुम्ही खरेदी केलेले तेल परस्पर विदेशात पाठवले असून, त्याच्या विक्रीतून मोठी रक्कम मिळाली आहे. मात्र, ती रक्कम डॉलरमध्ये आहे. कस्टम विभागाने अडविली आहे,’ असे तक्रारदाराला सांगितले. दरम्यान, त्यानंतर तक्रारदाराला एका व्यक्तीचा फोन आला. त्या व्यक्तीने ‘कस्टम अधिकारी बोलतोय’ असे सांगून तक्रारदाराकडून आणखी पैसे घेतले. अशाप्रकारे सायबर चोरट्यांनी त्यांच्याकडून ४९ लाख ९० हजार रुपये घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादींनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. अर्जाची चौकशी करून सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर तो विमानतळ पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments