Saturday, September 30, 2023
Homeताजी बातमीअतिवृष्टीमुळे ओढ्याला आलेल्या पुरामध्ये पुण्यातील चार जण गेले वाहून

अतिवृष्टीमुळे ओढ्याला आलेल्या पुरामध्ये पुण्यातील चार जण गेले वाहून


१५ ऑक्टोबर २०२०,
पुणे शहर आणि जिल्ह्याला बुधवारी पावसाने झोडपलं असून दरम्यान पावसामुळे ओढ्याला आलेल्या पुरात चार जण वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. दौंड तालुक्यातील राजेगावमध्ये ही घटना घडली आहे. तिघांचे मृतदेह हाती लागले असून एकाचा शोध सुरु आहे. दुचाकीवरुन जात असताना चौघे ओढ्यात वाहून गेले अशी माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे चौघे जण दोन दुचाकीवरुन ओढ्यातून चालले होते. भिगवण येथून दौंडकडे जात असताना राजेगावच्या चोपडे वस्तीजवळील ओढ्यात ते वाहून गेले आहेत. शहाजी गंगाधर लोखंड (52), सुभाष नारायण लोंढे (48), अप्पासो हरीचंद्र धायतोंडे (55) आणि कलावती अप्पासो धयातोंडे (48) अशी त्यांची नावे आहेत. सुभाष लोंढे यांचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. इतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

पुणे शहर आणि परिसरात बुधवारी पावसाने कहर केला. दिवसभर कमी-अधिक प्रमाणात सुरू असलेल्या पावसाने रात्री साडेआठनंतर रौद्ररूप धारण केल्याने सखल भागातील वस्त्यांमध्ये पाणी शिरले, तर अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने ते बंद झाले. कात्रज तलाव तुडुंब भरून वाहिल्याने आंबिल ओढय़ाच्या पाणीपातळीत वाढ झाली. गतवर्षी २५ सप्टेंबरला याच ओढय़ाच्या पुरामुळे दक्षिण पुण्यात हाहाकार उडाला होता. त्यामुळे बुधवारी रात्री झालेल्या मुसळधारांनी नागरिकांमध्ये धडकी भरली होती. मध्यरात्रीपर्यंत पावसाचा जोर कायम होता. दरम्यान, वसाहतींमध्ये शिरलेले पाणी काढण्याबरोबरच नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याबाबत अग्निशामक दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून रात्री उशिरापर्यंत काम सुरू होतं.

पुणे शहर आणि जिल्ह्यात आणखी दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे. काही भागांत मुसळधार, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. घाट क्षेत्रामध्ये तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments