पुण्याचे माजी खासदार आणि क्रीडा क्षेत्रातील ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून ते आजारपणाशी झुंज देत होते. त्यांच्या निधनामुळे पुण्याच्या राजकीय, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सुरेश कलमाडी यांचे पार्थिव आज दुपारी २ वाजेपर्यंत त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे. पुणे शहरातील विविध पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने त्यांच्या निवासस्थानी श्रद्धांजली अर्पण करत आहेत.
भारतीय हवाई दलात पायलट म्हणून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या कलमाडी यांनी पुढे राजकारणात प्रवेश करत पुण्याचे खासदार, केंद्रीय मंत्री तसेच भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) चे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली. ‘पुणे फेस्टिव्हल’ आणि ‘पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन’सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी पुण्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली.
त्यांच्या निधनाने एक अनुभवी राजकीय व्यक्तिमत्त्व आणि क्रीडा क्षेत्रातील प्रभावी नेतृत्व हरपल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त केली जात आहे.


