Monday, October 7, 2024
Homeमहाराष्ट्रमाजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव, चौधरी चरण सिंह आणि एम.एस. स्वामीनाथन यांना...

माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव, चौधरी चरण सिंह आणि एम.एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न जाहीर

काँग्रेसचे नेते, देशाचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर केल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक्स अकाऊंटवरून केली. त्यांच्यासह माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह आणि कृषी क्षेत्रात क्रांती घडविणारे डॉ. एम.एस. स्मामीनाथन यांनाही भारतरत्न पुरस्कार जाहीर केल्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली. एक्स अकाऊंटवर पंतप्रधान मोदी यांनी तीन पोस्ट टाकून या तीनही नेत्यांच्या नावांची घोषणा केली. माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्याबद्दल भावना व्यक्त करताना ते म्हणाले, माजी पंतप्रधान नरसिंह राव यांना भारतरत्न पुरस्काराची घोषणा करताना मला आनंद वाटत आहे.

आर्थिक विकासाचे द्वार उघडणारे पी. व्ही. नरसिंह राव

“एक प्रतिष्ठित विद्वान राजकारणी पी. व्ही. नरसिंह राव यांनी भारताच्या विकासात महत्त्वाचे योगदान दिले. त्यांनी आंध्र प्रदेशचे (एकत्रित) मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि अनेक वर्ष संसद आणि विधानसभेचे सदस्य म्हणून काम केले. त्यांच्या दूरदरशी नेतृत्वामुळे भारत आर्थिक आघाडीवर पुढे आला. देशाला समृद्धी आणि विकासाच्या मार्गावर नेण्यात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली”, असे गौरवोद्गार पंतप्रधान मोदी यांनी काढले.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, “पंतप्रधान या नात्याने नरसिंह राव यांचा कार्यकाळ देशासाठी महत्त्वाचा मानला जातो. त्यांनी जागतिक बाजारपेठेसाठी भारताचे द्वार उघडले. ज्यामुळे आर्थिक विकासाचे एक नवे युग सुरू झाले. याशिवाय परराष्ट्र धोरण, भाषा आणि शिक्षण क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानामुळे भारताला पुढे नेले, तसेच सांस्कृतिक आणि बौद्धिक पातळीवरही समृद्ध केले.”

आणीबाणीच्या विरोधात चौधरी चरण सिंह लढले

माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांच्याबद्दल माहिती देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “चौधरी चरण सिंह यांनी दिलेल्या अतुलनीय योगदानाला हा पुरस्कार समर्पित करत आहोत. त्यांनी शेतकऱ्यांचे अधिकार आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आपले पूर्ण आयुष्य वेचले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असो किंवा देशाचे गृहमंत्री किंवा साधे आमदार असतानाही त्यांनी केवळ राष्ट्र निर्माणाला महत्त्व दिले. आणीबाणीच्या विरोधातही त्यांनी ठाम भूमिका घेतली होती. आमच्या शेतकरी बांधवांसाठी त्यांची समर्पण वृत्ती आणि आणीबाणीच्या काळात त्यांनी लोकशाही वाचविण्यासाठी दाखविलेली तत्परता आम्हाला कायम प्रेरणा देत राहिल.”

कृषी क्षेत्रात आधुनिकता आणणारे एम. एस. स्वामीनाथन

हरित क्रांतीचे जनक आणि ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांनाही भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. त्यांच्याबद्दल भावना व्यक्त करताना पंतप्रधान म्हणाले, “कृषी आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी झटणाऱ्या डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानीत करत असताना मनस्वी आनंद वाटत आहे. अतिशय आव्हानात्मक काळात स्वामीनाथन यांनी भारतीय कृषी क्षेत्राला आत्मनिर्भर बनविण्यात मोलाची भूमिका वठवली. तसेच भारतीय कृषी क्षेत्राला आधुनिकतेकडे नेण्यात महत्त्वाचा वाटा उचलला.”

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments