Thursday, January 16, 2025
Homeगुन्हेगारीमाजी गृहमंत्री अनिल देशमुखांना ११ महिन्यांनंतर जामीन मंजूर…

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना ११ महिन्यांनंतर जामीन मंजूर…

कथीत १०० कोटी वसुली प्रकरणी गेल्या ११ महिन्यांपासून ‘ईडी’ कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज अखेर जामीन मंजूर झाला आहे. मात्र, असे असले तरी भ्रष्ट्राचाराच्या आरोपाप्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात त्यांना जामीन मिळालेला नाही. त्यामुळे आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांतर्गत जामीन मिळूनही देशमुख यांना कारागृहातच राहावे लागणार आहे.

गेल्या वर्षी २ नोव्हेंबररोजी ‘ईडी’ने अनिल देशमुख यांना कथीत १०० कोटी वसुली प्रकरणी अटक केली होती. गेल्या ११ महिन्यांपासून ते ‘ईडी’ कोठडीत होते. यादरम्यान, त्यांनी जामिनासाठीही प्रयत्न केला होता, पण त्यांना जामीन मिळू शकला नव्हता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्या एकलपीठाने बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी याप्रकरणी दिलेल्या जबाबाच्या विश्वासार्हतेवर यावेळी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. न्यायालयाने देशमुख यांना एक लाख रुपयांच्या हमीवर जामीन मंजूर केला.

या प्रकरणातील ईडीचा तपास कधीही न संपणारा आहे. तपासात काही नाही हे आढळून आल्यावर जबाब नोंदवून तपासातील रिक्त जागा भरल्या जात असल्याचा आरोप देशमुख यांच्यावतीने वकील विक्रम चौधरी यांनी केला होता. तसेच देशमुख यांची वैद्यकीय स्थिती आणि वय लक्षात घेऊन त्यांची जामिनावर सुटका व्हायला हवी, असे न्यायालयाला सांगून देशमुख यांना जामीन मंजूर करण्याची विनंती चौधरी यांनी केली होती.

या प्रकरणी ‘ईडी’तर्फे अतिरिक्त महान्यायअभिकर्ता अनिल सिंह यांनी युक्तिवाद करताना देशमुख यांना जामीन देण्यास विरोध केला होता. देशमुख यांच्यावर भ्रष्टाचार, अधिकृत पदाचा गैरवापर आणि आर्थिक गैरव्यवहारासारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे सिंह यांनी न्यायालयाला सांगितले होते. आर्थिक गैरव्यवहार हा गंभीर गुन्हा आहे आणि त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. त्यामुळे देशमुख यांची वैद्यकीय स्थिती आणि वय लक्षात घेऊन त्यांची जामिनावर सुटका व्हायला हवी या देशमुख यांच्या वकिलांच्या मागणीलाही सिंह यांनी विरोध केला होता. याउलट देशमुख यांना असलेल्या सगळ्या आजारांवर कारागृहातील रुग्णालयात उपचार केले जाऊ शकतात, असे त्यांनी न्यायालयाला सांगितले. देशमुख यांना वैद्यकीय उपचार उपलब्ध करून दिले नाहीत, असा त्यांचा आरोप नाही. वयाशी संबंधित आजार प्रत्येकालाच सतावतात. त्यांच्या वयाचे कैदीही कारागृहात असून जामिनासाठी हे कारण असू शकत नाहीत, असा दावा सिंह यांनी केला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments