Monday, July 15, 2024
Homeताजी बातमीबंजारा समाजाच्या विकासासाठी ‘वनार्टी’ व नंगारा बोर्ड स्थापणार

बंजारा समाजाच्या विकासासाठी ‘वनार्टी’ व नंगारा बोर्ड स्थापणार

बंजारा समाजाच्या विकासासाठी शासन सदैव सकारात्मक आहे. कुणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता शासन घेईल. बंजारा समाजाच्या विकासासाठी ‘वनार्टी’( वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था) संस्था, तसेच नंगारा बोर्ड स्थापन करुन त्यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पोहरादेवी येथे केली.

बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या संत सेवालाल महाराज यांच्या पंचधातुच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण, सेवाध्वजाचे आरोहण व ५९३ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यानंतर आयोजित सभेत ते बोलत होते. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड, ग्रामविकास मंत्री गिरिश महाजन, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, महंत बाबुसिंग महाराज, खा. भावना गवळी, खा. प्रतापराव जाधव, खा. उमेश जाधव, आ. ॲड. किरण सरनाईक, आ. राजेंद्र पाटणी, आ. संतोष बांगर, आ. इंद्रनील नाईक, आ. संजय रायमुलकर, आ. निलय नाईक, विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्‌टे, जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोहरादेवीचे सरपंच विनोद राठोड आदी उपस्थित होते.

मान्यवरांचे स्वागत पारंपरिक बंजारा पद्धतीने औक्षण करुन व लेझिम नृत्याने करण्यात आले. त्यानंतर देवीस भोग लावण्यात आला व हरदास पठण करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते पोहरादेवी व उमरी येथील ५९३ कोटी रुपयांच्या निधीतून करण्यात येणाऱ्या विकासकामांच्या भुमिपूजन कोनशिलेचे अनावरण झाले.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणाची सुरूवात गोर बंजारा बोलीत करून उपस्थितांना जिंकून घेतले, ते म्हणाले की, पोहरादेवी येथे आल्यावर काशीला आल्यासारखे वाटले. बंजारा समाज हा निसर्गपूजक आणि लढवय्या आहे. शासन हे सामान्य जनतेचे आहे. बंजारा समाजाच्या विकासासाठी नंगारा प्राधिकरण स्थापण्यासाठी शासनाने मान्यता दिली असून त्यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केली. तसेच वसंतराव नाईक महामंडळालाही निधी कमी पडू देणार नाही. तांडा सुधार योजनेत प्रत्येक तांड्यावर पाणी, रस्ते इ मूलभूत सुविधा विकासासह शाळा, दवाखाने, अंगणवाडी यासारख्या सुविधाही उपलब्ध करून देऊ,असे आश्वासन श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पोहरादेवी येथे हेलिपॅडवर आगमन होताच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सर्वप्रथम माता जगदंबा देवी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तसेच संत सेवालाल महाराज आणि संत रामराव महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत पालकमंत्री संजय राठोड,ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन,बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे,आमदार राजेंद्र पाटणी, आमदार ऍड.निलय नाईक,बंजारा समाजाचे धर्मगुरु महंत बाबूसिंग महाराज,महंत कबिरदास महाराज, शेखर महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments