हिंदी चित्रपटातील ‘सात समुंदर पार मैं तेरे पीछे पीछे आ गई’ या गाण्यानुसार पाच परदेशी तरुणी प्रेमासाठी सातासमुद्रापार आल्या आहेत. चित्रपटातील कथानकाप्रमाणेच या तरुणींनी पिंपरी-चिंचवड शहरातील तरुणांवर प्रेम करून त्यांच्याशी संसार थाटला आहे. या प्रेमी युगुलांच्या कुटुंबियांनी देखील त्यांचा स्वीकार केला आहे. जात, धर्म, वंश, भाषा किंवा राष्ट्रीयत्व, अशा प्रकारच्या प्रेमाला कोणत्याही सीमा नसतात. भौगोलिक तर नाहीच. अशाचप्रकारे पाच परदेशी तरुणी गेल्या वर्षभरात पिंपरी-चिंचवड शहरातील तरुणांच्या प्रेमात पडून त्यांच्याशी विवाहबद्ध झाल्या.
पिंपरी-चिंचवड शहरात देखील अशा पाच तरुणी आहेत. त्यांनी त्यांच्या मायदेशाला सोडत प्रियकरासाठी पिंपरी-चिंचवडकर होण्याचे पसंत केले. ही प्रेमाची जादूच आहे, असे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. यातील काही तरुणी कामानिमित्त तर काही पर्यटन तसेच शिक्षणासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये आल्या होत्या. दरम्यान त्यांचे पिंपरी-चिंचवडमधील तरुणांशी सूत जुळले. हृदयाच्या कप्प्यात प्रेमाची रुजवात झाली. त्यांनी एकमेकांविषयीचे प्रेम व्यक्त केले. त्यानंतर ते विवाहबंधनात अडकले.
परकीय नागरिक विभागाकडे नोंदणी…
एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या या प्रेमी युगुलांना एकमेकांच्या देशात जाण्यासाठी कायदेशीर मुभा दिली जाते. त्यासाठी त्यांना रितसर अर्ज करावा लागतो. कागदपत्र सादर केल्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अशा परदेशी नागरिकांची परकीय नागरिक नोंदणी विभागाकडे नोंदणी केली जाते. पिंपरी-चिंचवडच्या सून झालेल्या परदेशी पाच तरुणी तसेच जावई झालेल्या नेदरलॅंड येथील तरुणाने या विभागाकडे नोंदणी केली आहे.