Sunday, August 16, 2026
Homeताजी बातमीभारताच्या प्रगतीसाठी संशोधनावर लक्ष - पीसीयू कुलपती हर्षवर्धन पाटील 

भारताच्या प्रगतीसाठी संशोधनावर लक्ष – पीसीयू कुलपती हर्षवर्धन पाटील 

पीसीयू मध्ये आंतरराष्ट्रीय मास्टरमाइंड मीट चे उद्घाटन

भारताच्या औद्योगिक, आर्थिक प्रगतीसाठी नवोपक्रम व संशोधनावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आगामी काळात पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) हे स्टार्टअप केंद्रित विद्यापीठ म्हणून विकसित करण्यात येईल. तसेच हरित ऊर्जा, हवामान बदल, शाश्वत शेती, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जागतिक सहकार्य या क्षेत्रात संशोधन करून आव्हानांचे संधी मध्ये रूपांतर करून स्टार्टअपला चालना दिली जाईल. तसेच भारत – जपान सहकार्य माध्यमातून विकसित भारत २०४७ चे स्वप्न साकार होण्यास मदत होईल असे प्रतिपादन पीसीयू कुलपती हर्षवर्धन पाटील यांनी केले. 

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठात (पीसीयू) येथे ‘आंतरराष्ट्रीय मास्टरमाइंड मीट (आयएम ३)–२०२६’ च्या उद्घाटन प्रसंगी हर्षवर्धन पाटील बोलत होते. विकसित भारत २०४७ या संकल्पनेला संशोधन आणि नव उपक्रम या माध्यमातून गती देण्यासाठी आयोजित परिषदेत कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे, संशोधन व विकास संचालक तसेच डॉ. भरत काळे, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे महासंचालक डॉ. राजेंद्र जगदाळे, मायक्रोलिन (अमेरिका) चे संस्थापक डॉ. अशोक जोशी आणि युनिव्हर्सिटी ऑफ न्यूकॅसल, ऑस्ट्रेलिया येथील ग्लोबल इनोव्हेटिव्ह सेंटर फॉर ॲडव्हान्स्ड नॅनोमटेरियल्सचे संचालक प्रा. अजयन विनू , मिड स्वीडन विद्यापीठाचे डॉ. कौस्तुभ दलाल, सेंट्रल इलेक्ट्रोकेमिकल रिसर्च इन्स्टिट्यूटचे संचालक प्रा. विजय मोहनन पिल्लई, भारतीय विज्ञान संस्था, बेंगळुरू येथील प्रा. पी. एस. अनिल कुमार, टाटा केमिकल्सचे ग्लोबल हेड इनोव्हेशन डॉ. रिचर्ड लोबो, सी-डॅकचे डॉ. कृष्णांजन भट्टाचार्य, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डॉ. विलास खरचे, दक्षिण आफ्रिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ व्हेंडा येथील डॉ. फुलुफ्हेलो नेमांगवेले, भारतीय विज्ञान संस्थेचे डॉ. सचिन रोंडिया आदींसह देश विदेशातील नामवंत शास्त्रज्ञ, संशोधक, शिक्षणतज्ज्ञ, उद्योग प्रतिनिधी आणि धोरणकर्ते या परिषदेत सहभागी झाले होते. यावेळी ॲबस्ट्रॅक्ट स्मरणिका प्रकाशित करण्यात आली. 

कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांनी विद्यापीठातील संशोधन, नवोपक्रम आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी उभारण्यात आलेल्या सक्षम परिसंस्थेची माहिती देत विद्यार्थी आणि संशोधकांनी समाजोपयोगी संशोधन करण्याचे आवाहन केले.

प्रा. अजयन विनू यांनी कार्बन उत्सर्जन, हरित ऊर्जा, हायड्रोजन इंधन, स्वच्छ ऊर्जा आणि प्रगत नॅनोमटेरियल्स या विषयांवर मार्गदर्शन केले. तांत्रिक सत्रांमध्ये डॉ. अशोक जोशी यांनी ज्ञानाचे आर्थिक मूल्यात रूपांतर करणारी प्रक्रिया म्हणजे नवोपक्रम असून, तो देशाच्या अर्थव्यवस्था वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगितले. सेंट्रल इलेक्ट्रोकेमिकल रिसर्च इन्स्टिट्यूटचे संचालक प्रा. विजय मोहनन पिल्लई यांनी ऊर्जा साठवणूक, द्विमितीय पदार्थ, इलेक्ट्रोकॅटलिसिस, लिथियम-आयन बॅटरी, बॅटरी कचरा आणि स्वच्छ ऊर्जेतील आव्हाने यावर मार्गदर्शन केले.

प्रा. अजयन विनू यांनी प्रगत सच्छिद्र कार्बन आधारित पदार्थ, हायड्रोजन निर्मिती, कार्बन डायऑक्साइड नियंत्रण आणि पर्यावरणपूरक ऊर्जा उपाय यावरील संशोधन सादर केले. भारतीय विज्ञान संस्था, बेंगळुरू येथील प्रा. पी. एस. अनिल कुमार यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने क्वांटम पदार्थांचे अभियांत्रिकीतील संशोधन, मशीन लर्निंगचा वापर आणि आधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी आवश्यक प्रगत पदार्थ विकास याविषयी माहिती दिली.

 टाटा केमिकल्सचे ग्लोबल हेड, इनोव्हेशन डॉ. रिचर्ड लोबो यांनी जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्ता, संशोधनातील नवे प्रवाह आणि २०३५ पर्यंतच्या तांत्रिक परिवर्तनाची माहिती दिली. मिड स्वीडन विद्यापीठाचे डॉ. कौस्तुभ दलाल यांनी आरोग्य सेवेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या गुंतवणुकीचे आर्थिक मूल्यांकन, त्यातील आव्हाने आणि संधी स्पष्ट केल्या, सी-डॅकचे डॉ. कृष्णांजन भट्टाचार्य यांनी भाषा मॉडेल्स मधील डेटा करप्शन आणि त्यावरील उपाय याची माहिती दिली.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डॉ. विलास खरचे यांनी अचूक शेती, पीक निरीक्षण, हवामान बदलाशी सुसंगत शेती, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि स्मार्ट कृषी तंत्रज्ञान वापर याचे मार्गदर्शन केले. दक्षिण आफ्रिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ व्हेंडा येथील डॉ. फुलुफ्हेलो नेमांगवेले यांनी ब्लॉकचेन आधारित हरित ऊर्जा प्रणाली, ऊर्जा देवाण घेवाण, मशीन लर्निंग आधारित ऊर्जा अंदाज प्रणाली यावर सादरीकरण केले.

  भारतीय विज्ञान संस्थेचे डॉ. सचिन रोंडिया यांनी सौरऊर्जा निर्मितीसाठी प्रगत सेमिकंडक्टर पदार्थ, फोटोव्होल्टाइक तंत्रज्ञान आणि पुढील पिढीतील सौरऊर्जा संशोधनातील संधी याची माहिती दिली. 

ही आंतरराष्ट्रीय परिषद पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. प्रास्ताविक डॉ. भरत काळे यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments