राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षावर आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु होणार आहे. शिवसेना कोणाची यावरून सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेला वाद आता अंतिम टप्प्यात आला आहे. या प्रकरणी आता १४ फेब्रुवारीपासून सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात होत आहे. शिंदे गट व ठाकरे गटाची याचिका यादीत असून त्यावर सकाळी १०:३० वाजता सुनावणी होणार असल्याचे नमूद केले आहे.सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी घटनापीठाची स्थापना केली आहे. त्यात सरन्यायाधीश वाय.एस.चंद्रचूड व न्या. शहा, न्या. मुरारी, न्या. हिमा कोहली आणि न्या. नरसिम्हा यांचा समावेश आहे.
7 महिन्यांपासून सत्तासंघर्ष
राज्यात गेल्या 7 महिन्यांपासून सत्तासंघर्ष सुरू आहे आहे. शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर भाजपसोबत शिंदे यांनी सरकार स्थापन केले. त्याविरोधात शिवसेनेच्या दोन्ही गटांनी दाखल केलेल्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्यासह इतर मुद्यांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे.
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतचा प्रश्न निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे. या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे 30 जानेवारी रोजी सुनावणी झाली होती. त्यात ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांना लेखी युक्तिवाद सादर केला आहे. याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आधी निर्णय घ्यावा. तोपर्यंत निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्हाबाबत निर्णय घेऊ नये, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी केले आहे.