Tuesday, April 22, 2025
Homeमहाराष्ट्रपिंपरी चिंचवड शहरातील पाच जलतरण तलाव अद्याप बंदच

पिंपरी चिंचवड शहरातील पाच जलतरण तलाव अद्याप बंदच

उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने शहरातील नागरिकांची पावले पोहायला जाण्यासाठी जलतरण तलावाकडे वळत आहे. मात्र, महापालिकेचे शहराच्या विविध भागांतील १३ जलतरण तलावांपैकी आठच तलाव सुरू आहेत. तर, पाच तलाव अद्यापही बंद आहेत. त्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने केशवनगर, संभाजीनगर, कासारवाडी, पिंपरी वाघेरे, यमुनानगर, पिंपळेगुरव, नेहरूनगर, वडमुखवाडी, भोसरी, मोहननगर, थेरगाव, सांगवी, आकुर्डी या भागांत १३ जलतरण तलावांची उभारणी करण्यात आली आहे. मार्च महिना सुरू झाला असताना वातावरणातील तापमानही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे उन्हाच्या झळा जाणवू लागल्या असून, पोहोण्यासाठी जलतरण तलावांवर गर्दी होवू लागली आहे.

पालिकेच्या जलतरण तलावावर एक तास पोहोण्यासाठी वीस रुपये शुल्क आकारण्यात येते. तसेच मासिक पास ५०० रुपये, तिमाहीसाठी १२०० तर वार्षिक ४५०० रुपयापर्यंतचे पास देण्यात येतात. त्यामुळे पालिकेच्या तलावावर उन्हाळ्यात प्रचंड मोठी गर्दी असते. मात्र, महापालिकेने योग्य नियोजन न केल्यामुळे उन्हाळा सुरू झाला असतानाही पाच तलाव अद्याप कुलूपबंद आहेत.

थेरगाव, मोहननगर, यमुनानगर, निगडी आणि भोसरी येथील जलतरण तलावाचे कामे सुरू आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांना, खेळाडूंना खासगी जलतरण तलावावर जास्त पैसे मोजून पोहोण्यासाठी जावे लागत आहे. दरम्यान, महापालिकेच्या तलावावर पोहोण्यासाठी ऑनलाइन बुकिंग करण्यात येत आहे. महापालिकेच्या क्रीडा विभागाने मासिक पासही ऑनलाइन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

नेहरूनगरमधील कै. अण्णासाहेब मगर, पिंपळेगुरव येथील कै. काळूराम जगताप, पिंपरीवाघेरे, कासारवाडीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वडमुखवाडीतील श्री संत ज्ञानेश्वर, केशवनगर येथील कै. वस्ताद बाळासाहेब गावडे, सांगवीतील बाळासाहेब शितोळे आणि संभाजीनगर येथील साई अक्वामरिन हे आठ तलाव सुरू आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments