१२ आॅक्टोबर २०२०,
पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. तसेच अनेक रुग्ण होम आयसोलेशनचा (घरीच राहून उपचार) पर्याय निवडत आहेत. त्यामुळे महापालिकेचे वायसीएम रुग्णालय, जम्बो कोविड सेंटर, आॅटो क्लस्टर, बालनगरी कोविड सेंटरमधील बेड रिकामे पडले आहेत. पहिल्या टप्प्यात पाच कोविड सेंटर बंद करण्यात आली. त्यानंतर 10 कोविड सेंटरपैकी एक-दोन वगळता अन्य सर्वच कोविड सेंटर बंद करण्यात येणार आहेत.
शहरात मार्च महिन्यात पहिला कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळला. त्यानंतर जूनपर्यंत कोरोना रुग्णांची स्थिती आटोक्यात होती. मात्र, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवाड्यापर्यंत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत होती. दररोज बाराशे ते दीड हजारांपर्यंत रुग्ण आढळत होते. त्यानंतर गेल्या पंधरा दिवसांपासून रुग्णसंख्येत घट होत आहे.