मोशी अग्निशमन केंद्रात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांमध्ये अग्निसुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत मोशी येथील सिटी प्राईड स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी मोशी अग्निशमन केंद्रात अग्निसुरक्षा साहित्य प्रदर्शन आणि प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या वेळी अग्निशमन जवानांनी विद्यार्थ्यांना अग्निशमन विभागाची कार्यपद्धती, विविध अग्निशमन उपकरणे, बचाव साहित्य तसेच अग्निशमन वाहनांची वैशिष्ट्ये याबाबत माहिती दिली. उपकरणांचा प्रत्यक्ष वापर कसा केला जातो, याचेही प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले.
आग लागल्यास घ्यावयाची खबरदारी, आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षितपणे बाहेर पडण्याच्या पद्धती, प्राथमिक उपाययोजना तसेच आपत्कालीन मदतीसाठी अग्निशमन विभागाच्या १०१ क्रमांकावर संपर्क साधण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी अग्निशमन वाहनांची पाहणी करत विविध उपकरणांची माहिती प्रत्यक्ष अनुभवातून जाणून घेतली. तसेच विद्यार्थ्यांनी अग्निसुरक्षेशी संबंधित विविध प्रश्न विचारत कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. अग्निशमन जवानांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना सविस्तर उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसन केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अग्निसुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन आणि आपत्कालीन परिस्थितीत योग्य पद्धतीने प्रतिसाद देण्याबाबत जागरूकता निर्माण झाली. शालेय स्तरापासूनच अग्निसुरक्षेची संस्कृती रुजविण्यासाठी महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडून अशा प्रकारचे जनजागृती उपक्रम यापुढेही राबविण्यात येणार आहेत.


