Monday, December 4, 2023
Homeताजी बातमीपिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या चौथ्या मजल्यावर आग… सायरनचा आवाज…धुराचे लोट..राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह निमित्ताने...

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या चौथ्या मजल्यावर आग… सायरनचा आवाज…धुराचे लोट..राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह निमित्ताने फायर मॉकड्रिल

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामधील चौथ्या मजल्यावरील सामान्य प्रशासन विभागाजवळील कक्षाला दुपारी ३ च्या सुमारास अचानक आग लागली…सायरनचा आवाज सुरु झाला…धुराचे लोट…परिस्थितीचे गांभीर्य पाहून आपत्कालीन व्यवस्थापनामध्ये कार्यरत असलेल्या अधिका-यांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ समन्वय साधून सर्व संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या…सूचना मिळताच सर्व यंत्रणा कार्यान्वित झाल्या… अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले…या मजल्यासह इमारतीत उपस्थित असलेल्या अधिकारी कर्मचारी आणि नागरिकांना तात्काळ इमारतीबाहेरील सुरक्षित स्थळी जाण्यास सांगण्यात आले…या इमारतीत लागलेल्या या आगीवर नियंत्रण मिळताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला…

हा सर्व प्रकार घडला तो मॉकड्रीलच्या निमित्ताने. ’’राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचे” औचित्य साधून सरकारी कार्यालयाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये संकटकालीन बचाव प्रशिक्षण (फायर मॉकड्रिल) चे आयोजन करण्यात आले होते. कार्यालयीन इमारतीत आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी उपलब्ध असलेल्या यंत्रणांमधील आपत्कालीन समन्वय आणि बचाव करण्याकामी करण्याची कार्यवाही याबद्दल माहिती व्हावी या उद्देशाने आज मॉकड्रील घेण्यात आले. अग्निशमन दल, पोलीस, सुरक्षा दल तसेच इमारतीतील अधिकारी कर्मचारी आणि नागरिक या मॉकड्रीलमध्ये सहभागी झाले होते. अग्निशमन दलाचे ३ बंब, २ फायर फायटर मोटार बाईक, २ रुग्णवाहिका, २ पाण्याचे टँकर यांचा वापर या मॉकड्रिल मध्ये करण्यात आला. तर अग्निशमन, सुरक्षा, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन दलाचे जवान यात सहभागी झाले होते.

कार्यालयात अचानक आग लागली असता आगीवर नियंत्रण मिळवून त्या आगीपासून या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व अधिकारी, कर्मचारी, नागरिकांच्या जीवीताचे संरक्षण करता यावे, या बाबतच्या पूर्वतयारीसाठी संकटकालीन बचाव प्रशिक्षण (फायर मॉकड्रिल) महत्वपूर्ण ठरणार आहे. आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, प्रदीप जांभळे पाटील, सहशहर अभियंता ज्ञानेश्वर जुन्धारे, प्रमोद ओंभासे, मुख्य लेखाधिकारी जितेंद्र कोळंबे, उपायुक्त विठ्ठल जोशी, मनोज लोणकर, रविकिरण घोडके, संदीप खोत, सहायक आयुक्त विजयकुमार थोरात, वामन नेमाणे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, अग्निशमन अधिकारी ॠषिकांत चिपाडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, आपत्कालीन परिस्थितीत इनसिडेंट कमांडर आणि विविध पथक प्रमुख म्हणून काम पाहणारे अधिकारी तसेच सुरक्षितता समिती पथकातील पथक प्रमुख यांच्या अधिपत्याखाली फायर मॉकड्रिल आयोजित केले गेले. यशदाचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे माजी संचालक कर्नल विश्वास सुपनेकर यांच्या निरीक्षणाखाली फायर मॉकड्रिल पार पडले.

या फायर मॉकड्रिल दरम्यान कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी त्यांची जबाबदारी योग्यरीत्या पार पाडली. तसेच संकटकालीन बचाव प्रशिक्षण (फायर मॉकड्रिल) साठी संबंधित फायर पंप ऑपरेटर, पाणीपुरवठा मदत विषयक पथक, बायो मेडिकल सपोर्ट पथक, अग्निशामक केंद्र पथक, आरोग्य पथक, फायर लायसन्स एजंसी, माहिती व जनसंपर्क पथक, प्रसारमाध्यम व्यवस्थापन पथक, रुग्णवाहिका दळणवळण पथक, वैद्यकीय मदत पथक, विद्युत, स्थापत्य तसेच पोलिस मदत पथक यांच्यात समन्वय साधून संकटकालीन बचाव प्रशिक्षण (फायर मॉकड्रिल) यशस्वीपणे पार पाडले.

संकटकालीन बचाव प्रशिक्षण (फायर मॉकड्रिल) बद्दल माहिती देताना आयुक्त शेखर सिंह म्हणाले, महापालिका कार्यालयामध्ये कोणतीही आपत्कालीन घटना घडल्यास त्या परिस्थितीला कशा पद्धतीने सामोरे जावे याची चाचपणी घेण्यासाठी अशाप्रकारे मॉक ड्रिल घेणे आवश्यक आहे. आज महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये मॉक ड्रिल घेण्यात आले. इमारतीमध्ये बसविण्यात आलेल्या अग्निशमन उपकरणांची तसेच आपत्कालीन यंत्रणांची या माध्यमातून चाचपणी घेण्यात आली. महापालिकेच्या वतीने शहरात इतर ठिकाणी देखील असे मॉक ड्रिल घेतले जात आहे. नागरीकांनी आपत्कालीन परिस्थितीमध्ये सतर्क राहून बचाव करण्यासाठी कशाप्रकारे सामोरे जावे याची माहिती मॉक ड्रिलमधून दिली जात आहे. असे मॉकड्रिल सातत्याने घेतले जाईल.

आज झालेल्या मॉकड्रिलसाठी इनसिडेंट कमांडर म्हणून नियुक्त करण्यात आलेले उप आयुक्त विठ्ठल जोशी मॉकड्रिल बद्दल माहिती म्हणाले, महापालिका इमारतीमध्ये लागलेल्या आगीची सूचना मिळताच अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करून त्यांना सूचना देण्यात आल्या. प्रत्येक मजल्यासाठी नेमलेल्या मार्शलने कार्यालयातील सर्व दालनांची तपासणी करून उपस्थितांना इमारतीबाहेर जाण्याच्या सूचना दिल्या. इमारतीमध्ये उपस्थित असणारे ६२७ अधिकारी कर्मचारी आणि ४० नागरिकांना ८ मिनिट ३ सेकंदामध्ये सुखरूप बाहेर काढण्यात आले. सावधानता म्हणून वीज पुरवठा खंडित करण्यात आला. दरम्यान ३ मिनिटांमध्ये अग्निशमन पथक बंबासह घटनास्थळी दाखल झाले. रुग्णवाहिका देखील दाखल झाल्या. १५ ते २० मिनिटांमध्ये आगीवर नियंत्रण मिळवून संपूर्ण आग विझवण्यात आली. यामध्ये कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झाली नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments