शहरात वाढणारी गुंडगिरी, कोयता गॅंग, वाहतूक समस्या आणि सायबर गुन्ह्यांबाबत अनेक प्रश्न ट्विटर धारकांनी विचारले.
पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालय स्थापनेपासुन पहिल्यांदाच पोलिस आयुक्तांनी ट्विटरवरून नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. पिंपरी- चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी हा अभिनव उपक्रम सुरू केलेला असून साडेतीनशे पेक्षा अधिक प्रश्न त्यांना नागरिकांनी ट्विटरवरून विचारले आहेत. २५० पेक्षा अधिक नागरिकांनी आयुक्तांना थेट प्रश्न विचारले तर अनेकांनी प्रश्न ट्विट केले. शहरात वाढणारी गुंडगिरी, कोयता गॅंग, वाहतूक समस्या आणि सायबर गुन्ह्यांबाबत अनेक प्रश्न ट्विटर धारकांनी विचारले.
पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आयुक्तालयाचा पदभार स्विकारल्यापासून पहिल्यांदाच ट्विटरद्वारे शहरातील नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रामुख्याने शहरात वाढणारी गुंडगिरी, वाहतूक कोंडी, कोयता गॅंग असे प्रश्न आयुक्तांना विचारण्यात आले. चार महिन्यात ५९ शस्त्रे, २७६ कोयते जप्त करण्यात आले असून १३५ कुख्यात गुंडांवर मोक्का आणि एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आल्याचे ट्विटरवरून आयुक्तांनी सांगितले.
https://twitter.com/CP_PCCity?s=20
भविष्यात ही अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी नागरिकांना ट्विटरवरून दिले आहे. परंतु, ट्विटरवर ऍक्टिव्ह असलेले पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे हे प्रत्येक्षात शहरातील गुन्हेगारी कधी आटोक्यात आणणार हा देखील मोठा प्रश्न आहे. चाकण, भोसरी, एमआयडीसी परिसरात कामगारांना लुटले जाते. एकीकडे आम्ही कामगारांच्या पाठीशी आहोत असे अनेकदा आयुक्तांनी भासवलेले आहे. प्रत्येक्षात मात्र जैसे थे परिस्थिती आहे.