Tuesday, April 21, 2026
Homeआरोग्यविषयकशहरात श्वान संगोपन केंद्रासाठी प्रभागनिहाय जागा शोधा – महापौर रवि लांडगे

शहरात श्वान संगोपन केंद्रासाठी प्रभागनिहाय जागा शोधा – महापौर रवि लांडगे

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी महापौर रवि लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात आढावा बैठक पार पडली. यावेळी शहरातील भटक्या श्वानांच्या व्यवस्थापनासोबतच त्यांचे संगोपन, आरोग्य सेवा आणि नागरिकांच्या तक्रारींचे प्रभावी निवारण यासाठी ठोस उपाययोजना करा. पिंपरी चिंचवड शहरात श्वान संगोपन केंद्रासाठी प्रभागनिहाय जागा शोधा, अशा सूचना महापौर रवि लांडगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

या बैठकीस उपमहापौर शर्मिला बाबर, अतिरीक्त आयुक्त विक्रांत बगाडे, नगरसदस्या वैशाली काळभोर, वैशाली घोडेकर, अर्चना सस्ते, नगरसदस्य अनंत कोऱ्हाळे, मंदार देशपांडे, उत्तम केंदळे, संजय काटे, सुहास कांबळे, उपायुक्त संदीप खोत, अण्णा बोदडे, पशुवैद्यकीय अधिकारी अरुण दगडे तसेच संबंधित कर्मचारी उपस्थित होते.

बैठकीदरम्यान महापौर रवि लांडगे यांनी शहरात श्वान संगोपन केंद्र उभारण्याबाबत विशेष भर देत, यासाठी प्रभागनिहाय उपलब्ध जागांची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या. या केंद्रांच्या माध्यमातून भटक्या श्वानांचे संगोपन, लसीकरण, उपचार तसेच नसबंदी प्रक्रिया अधिक प्रभावीपणे राबविता येईल, असे त्यांनी नमूद केले. यासाठी संबंधित नगरसदस्यांच्या सहकार्याने प्रभागनिहाय योग्य जागा निश्चित करून त्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

तसेच शहरातील भटक्या व पाळीव श्वानांची अचूक संख्या, त्यांचे वितरण तसेच नसबंदी आणि लसीकरणाची सद्यस्थिती याबाबत सविस्तर सर्वेक्षण करून अहवाल तयार करण्याचे आदेश महापौरांनी दिले. शहरातील नागरिकांकडून येणाऱ्या श्वानांबाबतच्या तक्रारींचे तात्काळ व प्रभावी निवारण करण्यासाठी पशुवैद्यकीय विभागाने समन्वयाने काम करण्याचेही त्यांनी सांगितले.

शहरातील भटक्या श्वानांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणे, त्यांचे आरोग्य संवर्धन करणे तसेच नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने अधिक नियोजनबद्ध आणि परिणामकारक पद्धतीने काम करावे, असे निर्देशही महापौर रवि लांडगे यांनी यावेळी दिले.

यावेळी उपायुक्त संदीप खोत यांनी पशुवैद्यकीय विभागामार्फत करण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. शहरात प्राणी जन्मनियंत्रण (ABC) अंतर्गत नसबंदी मोहिमेसाठी सध्या चार विशेष वाहने कार्यरत असून, या वाहनांद्वारे श्वान पकडणे,नसबंदी करणे आणि त्यांना पुन्हा त्यांच्या परिसरात सोडणे ही प्रक्रिया राबविली जात आहे. तसेच जखमी किंवा आजारी प्राण्यांवर उपचार करणे आणि नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करण्यासाठीही ही वाहने वापरण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना आवश्यक तांत्रिक प्रशिक्षण देण्यात आले असून, प्राण्यांशी संवेदनशील पद्धतीने वागण्याबाबत विशेष मार्गदर्शनही देण्यात आले आहे. श्वान संगोपन केंद्र उभारण्यासाठी शहरातील काही संभाव्य जागांची प्राथमिक पाहणी देखील करण्यात आली असून, त्याबाबत पुढील कार्यवाही सुरू असल्याचे उपायुक्त खोत यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments