केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्या आज सलग आठवा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या काळात काही विशेष घोषणा अपेक्षित आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सकाळी 11 वाजता लोकसभेत येत्या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी राज्यसभेत अर्थसंकल्प मांडतील.
सामान्यांपासून ते कॉर्पोरेट जगतापर्यंत सर्वजण या अर्थसंकल्पाची आतुरतेने वाट पाहत आहेत. यावेळी असे दिसते की सरकार महागाई आणि कर आघाडीवर लोकांना काही मोठा दिलासा देऊ शकते. यातील सर्वात मोठी भेट कर सवलतीच्या स्वरूपात असण्याची अपेक्षा आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे भाषण सकाळी 11 वाजता सुरू होईल. गेल्या चार अर्थसंकल्पांप्रमाणे आणि एका अंतरिम अर्थसंकल्पाप्रमाणे, हे अर्थसंकल्प देखील कागदविरहित असेल.
या अर्थसंकल्पात कोणत्या मोठ्या घोषणा असू शकतात….
उत्पादन शुल्कात कपात केल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होऊ शकतात. सध्या पेट्रोलवर 19.90 रुपये आणि डिझेलवर 15.80 रुपये शुल्क आकारले जाते.
यासोबतच सोने आणि चांदीवरील आयात शुल्क वाढवले जाऊ शकते. सध्या त्यावर 6 टक्के शुल्क आकारले जाते. यामुळे सोने आणि चांदीच्या किमती वाढू शकतात.
ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधित भागांवरील आयात शुल्क कमी केले जाऊ शकते. सध्या त्यावर 20 टक्के शुल्क आकारले जाते. यामुळे मोबाईलसारख्या वस्तू स्वस्त होऊ शकतात.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला राष्ट्रपतीनी केलं संबोधित…
दरम्यान, देशाच्या विकासासाठी आणि लोकांच्या कल्याणासाठी केंद्र सरकार अत्यंत वेगवान पद्धतीनं काम करत असून 2047 पर्यंत विकसित भारताची उभारणी करण्यासाठी सर्व नागरिकांनी योगदान द्यावं, असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल (दि.31) केलं. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला त्यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित केलं. आपल्या भाषणात त्यांनी सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लेखाजोखा मांडला. गेल्या 10 वर्षात पायाभूत सुविधांसाठीची अर्थसंकल्पातली तरतूद साडेपाच पटींनी वाढली; सरकारी योजनांचा सर्वाधिक लाभ वंचित, गरीब आणि आदिवासी समुदायाला होत असून शिक्षण, महिला सशक्तीकरण, मध्यमवर्ग आणि कर्मचाऱ्यांचं हित, क्रीडा क्षेत्र याकडे सरकारचं लक्ष आहे, असं राष्ट्रपती म्हणाल्या.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, ओमप्रकाश चौटाला आणि दिबंगत माजी खासदारांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष 2024-25 चा आर्थिक सर्वेक्षण अहवाल लोकसभेत सादर केला. आणि नंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.


