आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पिंपरी चिंचवडच्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असा भाजपाचा प्रयत्न आहे. मात्र, महाविकास आघाडीदेखील ही निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने या जागेसाठी नाना काटे यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. जयंत पाटील यांना ट्वीट करत याबाबत माहिती दिली.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाना काटे हे उमेदवार असतील. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र काम करून या निवडणुकीत आम्ही नक्कीच विजयी होऊ हा आम्हाला विश्वास आहे, असं ट्वीट जयंत पाटील यांनी केलं आहे.
दरम्यान, उमेदवारी घोषित झाल्यानंतर नाना काटे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने सहानुभूती व्यक्त केली आहे. मात्र, सहानुभूती आणि राजकारण या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. अजित पवार यांनी ज्या प्रकारे चिंचवडचा विकास केला आहे. त्याच मुद्द्यावरून आम्ही या निवडणुकीला पुढे जाऊ, असे ते म्हणाले. तसेच या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढणार असून आमचाच विजय होईल, अशा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.