२६ नोव्हेंबर २०२०,
केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी झालेल्या बैठकीत लक्ष्मी विलास बँकेचे डीबीएस इंडिया बँकेत विलीन करण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी होणार असून शुक्रवार २७ नोव्हेंबरपासून लक्ष्मी विलास बँक डीबीएस इंडिया बँकेत विलीन होईल.
लक्ष्मी विलास बँकेचे डीबीएस बँक इंडियामध्ये २७ नोव्हेंबरपासून विलीनीकरण होईल. याच दिवशी लक्ष्मी विलास बँकेवर लावण्यात आलेले तात्पुरते निर्बंध दूर होतील आणि ग्राहक पूर्वीप्रमाणे व्यवहार करू शकतील, असे रिझर्व्ह बँकेन म्हटलं आहे. त्यामुळे ९४ वर्षांपासून दक्षिण भारतातील आघाडीची बँक अशी असलेली लक्ष्मी विलास बँकेची ओळख आता काळाच्या पडद्याआड जाणार आहे.
लक्ष्मी विलास बँकेचे कमर्चारी डीबीएस बँकेत सामावून घेतले जाणार आहेत. शुक्रवार २७ नोव्हेंबरपासून लक्ष्मी विलास बँकेची ओळख डीबीएस बँक अशी होणार आहे. देशभरातील लक्ष्मी विलास बँकेच्या सर्व शाखा यापुढे डीबीएस बँक इंडिया या नावाने कामकाज करतील, असे रिझर्व्ह बँकेने म्हटलं आहे.
शुक्रवारपासून ठेवीदार आणि ग्राहकांना नेहमीप्रमाणे व्यवहार करता येणार आहेत. अशा प्रकारे आर्थिक संकटात सापडलेलया बँकेचे ग्राहकांना कोणताही धक्का न लावता तातडीने तोडगा काढण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केलं आहे. कॅबिनेटने दिलेली विलनीकरणाला मंजुरी दोन्ही बँकांसाठी समान संधी आहे. डीबीएसला भारतीय बँकिंग क्षेत्रात आपला विस्तार करता येणार असून लक्ष्मी विलास बँकेच्या ग्राहकांची जमापुंजी सुरक्षित राहणार असून त्यांचे व्यवहार पुन्हा सुरु राहतील, असे मत बँकिंग तज्ज्ञ समीर जैन यांनी व्यक्त केले.
आर्थिक संकटात सापडल्यानंतर केंद्र सरकारने मोरॅटोरियम लागू केल्याने लक्ष्मी विलास बँकेच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती. मात्र आज कॅबिनेटमध्ये लक्ष्मी विलास बँकेला डीबीएस बँकेत विलीन करण्यास मंजुरी दिली. त्यानंतर तातडीने शेअर बाजारातील सूत्रे हल्ली.मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजार यांनी गुरुवार २६ नोव्हेंबरपासून लक्ष्मी विलास बँकेचा शेअर रोजच्या व्यवहारातून बाद करण्यात आल्याचे जाहीर केले.