Thursday, January 16, 2025
Homeमहाराष्ट्रअखेर पाच वर्षांनी पोलीस आयुक्तालयाला मिळाली हक्काची जागा, ‘या’ ठिकाणी होणार आयुक्तालय..

अखेर पाच वर्षांनी पोलीस आयुक्तालयाला मिळाली हक्काची जागा, ‘या’ ठिकाणी होणार आयुक्तालय..

पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी हक्काची जागा मिळाली आहे. पुणे महानगर विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) च्या मालकीची वाकड पेठ क्रमांक ३९ येथील डिस्ट्रीक सेंटरमधील १५ एकर जागा वाणिज्य चालू दरपत्रकानुसार पोलीस आयुक्तालयाला देण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या ठिकाणी सुसज्ज कार्यालय उभारण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची निर्मिती १५ ऑगस्ट २०१८ मध्ये करण्यात आली. आयुक्तालयाचे कामकाज २०१८ मध्ये सुरू झाले. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून अद्याप आयुक्तालयासाठी हक्काची जागा मिळलेली नाही. देहूगाव गायरान येथील ५० एकर जागा पिंपरी-चिंचवड आयुक्तालयासाठी देण्याबाबत राज्य शासनाने मंजुरी दिली होती. मात्र, या जागेला देहू देवस्थान, स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला. त्यासाठी ग्रामस्थांनी आंदोलनात्मक भूमिका घेतली होती. ही जागा उपलब्ध होण्यास विलंब आणि अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे मोशी येथील गायरान जागेचीही पोलीस आयुक्तालयासाठी पाहणी केली होती. परंतु, त्या जागेचाही पर्याय मागे पडला.

पाच वर्षांपासून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयास स्वतंत्र जागा तसेच शासकीय इमारत उपलब्ध नाही. सध्याचे पोलीस आयुक्त कार्यालयसुद्धा पिपरी-चिंचवड महापालिका शाळेच्या इमारतीमध्ये भाडेतत्वावर तात्पुरत्या स्वरुपात सुरु आहे. कामकाजाच्या दृष्टीने ही जागा अत्यंत अपुरी आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस आयुक्त कार्यालय तसेच इतर कार्यालये, कवायत मैदान, क्रीडांगण व निवासस्थाने यासाठी जागा मिळण्याकरीता शासनाला प्रस्ताव पाठविला. त्याचा पाठपुरावा केला. त्यानुसार राज्य शासनाने शुक्रवारी पुणे महानगर विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) च्या मालकीची वाकड पेठ क्रमांक ३९ येथील डिस्ट्रीक सेंटरमधील १५ एकर जागा वाणिज्य चालब दरपत्रकानुसार पोलीस आयुक्तालयाला देण्यास मान्यता दिली आहे. हे ठिकाण हे मध्यवर्ती असून प्रशासकीय व नागरिकांच्या दृष्टीने सोयीचे होणार आहे. लवकरच या ठिकाणी सुसज्ज कार्यालय उभारण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments