Friday, September 11, 2026
Homeआरोग्यविषयकदोन दिवसांत शहरातील खड्डे बुजवा; दिरंगाई झाल्यास कठोर कारवाई

दोन दिवसांत शहरातील खड्डे बुजवा; दिरंगाई झाल्यास कठोर कारवाई

रस्ते, पदपथ, रेलिंग व दुभाजकांच्या दुरुस्तीसाठी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांवरील खड्डे तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित सार्वजनिक सुविधांच्या दुरुस्तीला महापालिका प्रशासनाने वेग दिला आहे. शहरातील रस्त्यांवरील खड्डे येत्या दोन दिवसांत बुजवण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

रस्त्यांवरील खड्ड्यांची तातडीने पाहणी करून दुरुस्तीची कामे हाती घेण्याच्या सूचना सर्व विभागीय कार्यकारी अभियंते, उपअभियंते आणि कनिष्ठ अभियंत्यांना देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, नागरिकांच्या तक्रारींची वाट न पाहता अधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्राची नियमित पाहणी करून समस्यांची स्वतःहून नोंद घ्यावी, असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.

खड्डे बुजवताना गुणवत्तेचीही तपासणी

खड्डे बुजविताना केवळ तात्पुरती डागडुजी न करता कामाचा दर्जा, टिकाऊपणा आणि नागरिकांची सुरक्षितता याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रस्त्यांच्या दुरुस्तीबरोबरच रेलिंग, दुभाजकांवरील बॅरिकेड्स, पदपथ आणि इतर सार्वजनिक सुविधांचीही पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

क्षेत्रीय कार्यालयनिहाय कामांचे नियोजन करून प्राधान्यक्रम निश्चित करावा आणि त्यानुसार दुरुस्तीची कामे प्रभावीपणे पूर्ण करावीत, असेही आयुक्तांनी सांगितले.

अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित

प्रत्येक विभागीय कार्यकारी अभियंता, उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंता यांच्या कार्यक्षेत्रातील रस्ते व सार्वजनिक सुविधांच्या देखभालीची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या क्षेत्रातील कामांचे नियोजन, अंमलबजावणी आणि गुणवत्तेची तपासणी यावर विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित कामांमध्ये दिरंगाई अथवा हलगर्जीपणा झाल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिला आहे.

दररोज होणार कामांचा आढावा

दुरुस्तीच्या कामांवर प्रभावी देखरेख ठेवण्यासाठी अतिरिक्त महापालिका आयुक्त, मुख्य अभियंता आणि सह शहर अभियंता यांनी संबंधित कामांचा नियमित आढावा घ्यावा. खड्डे बुजविण्याबरोबरच रेलिंग, दुभाजक आणि पदपथांच्या दुरुस्तीच्या कामांची क्षेत्रीय कार्यालयनिहाय दररोज प्रगती तपासून अहवाल आयुक्तांना सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

नागरिकांना सुरक्षित, सुस्थितीत आणि दर्जेदार रस्ते व सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असेही महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

आयुक्त म्हणतात…

“नागरिकांना सुरक्षित, सुस्थितीत आणि दर्जेदार रस्ते तसेच सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देणे हे महापालिका प्रशासनाचे प्रमुख प्राधान्य आहे. रस्त्यांवरील खड्डे तसेच रेलिंग, दुभाजक आणि पदपथांच्या दुरुस्तीची कामे तातडीने आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारीची प्रतीक्षा न करता आपल्या कार्यक्षेत्राची नियमित पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करावी. कामांमध्ये दिरंगाई किंवा हलगर्जीपणा आढळल्यास नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल.” — डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments