Monday, October 7, 2024
Homeताजी बातमीपहिल्या चित्रपटाच्या प्रदर्शनास सव्वाशे वर्षे पूर्ण

पहिल्या चित्रपटाच्या प्रदर्शनास सव्वाशे वर्षे पूर्ण

२८ डिसेंबर २०२०
रुळावरून धावणारी आगगाडी स्टेशनमध्ये येत आहे आणि माळी बागेला पाणी देत आहे, अशा एक-दीड मिनिटांच्या चलतचित्रांच्या माध्यमातून रूपेरी पडद्यावर चालणाऱ्या आणि धावणाऱ्या जिवंत माणसांना पाहून प्रेक्षक चकित झाले या घटनेला सोमवारी (२८ डिसेंबर) सव्वाशे वर्षे पूर्ण होत आहेत. मूकपटापासून नंतर बोलपटाची निर्मिती आणि आता जगभरात लोकप्रिय झालेल्या चित्रपट माध्यमाने इतकी प्रगती केली आहे की आपल्या मोबाइलवरही आता रसिक चित्रपट पाहण्याचा आनंद लुटत आहेत.

फ्रान्सच्या ल्यूमिअर बंधू यांनी २८ डिसेंबर १८९५ रोजी पॅरिस येथील एका कॅफेमध्ये चलतचित्रांचा पहिला खेळ सादर केला. चित्रपट माध्यमाचा उगम असलेल्या या घटनेला सव्वाशे वर्षे पूर्ण होत आहेत. ही प्रत्यक्षदर्शी चित्रे मूक होती आणि एक-दीड मिनिटांची होती. मात्र, या मूकपटाचे कथापट होण्यासाठी आणखी सात वर्षांची म्हणजे १९०२ पर्यंत वाट पाहावी लागली. गेल्या सव्वाशे वर्षांत विज्ञानाच्या प्रगतीबरोबरच चित्रपटाची प्रगती होत गेली.

शब्द माध्यमापेक्षा भिन्न असलेल्या अनेक प्रतिमांनी चित्रपटाची निर्मिती होते. १८९५ ते १९२७ अशी ३२ वर्षे चित्रपटांत ध्वनी नव्हता. तरीही त्या चित्रपटांत सांगितलेली कथा लाखो प्रेक्षकांपर्यंत प्रतिमांद्वारे पोहोचत होती. चार्ली चॅप्लीन १९१५ साली पडद्यावर आला आणि मूकपटांच्या माध्यमातून पुढच्या पाच वर्षांत जगभर पोहोचला, अशी माहिती चित्रपटांचे अभ्यासक सतीश जकातदार यांनी दिली.

प्रचंड लोकप्रियता..

’ ल्यूमिअर बंधूंनी पॅरिसमध्ये सुरू केलेले खेळ प्रचंड लोकप्रिय झाले. कॅफेसमोर प्रेक्षकांच्या रांगा लागायच्या. म्हणून दिवसाला २० खेळ करावे लागायचे.

’ चलतचित्रांची ही लोकप्रियता पाहून जानेवारी १८९६ मध्ये ‘अरायव्हल ऑफ दि ट्रेन’ हा दीड मिनिटांचा मूकपट चित्रित केला गेला. त्यामध्ये आगगाडी हळूहळू स्टेशनमध्ये प्रवेश करते, असे दृश्य पकडण्यात आले.

’ कॅमेऱ्याच्या भाषेत बोलायचे तर आगगाडी ‘क्लोजअप’मध्ये पुढे सरकताना दिसते. हा खेळ पाहणाऱ्या पहिल्या प्रेक्षकांना गाडी क्लोजअपमध्ये येऊ लागताच आता ती आपल्या अंगावर येणार, म्हणून प्रेक्षक खुर्ची सोडून कॅफेबाहेर पळाले होते.

’ नंतर सहा महिन्यांनी ७ जुलै १८९६ रोजी या चित्रपटाचा पहिला खेळ मुंबई येथील हॉटेल व्ॉटसन येथे झाला होता, असे जकातदार यांनी सांगितले.

पहिल्या चित्रपटाच्या निर्मितीसह ल्यूमिअर बंधू यांनी निर्मिलेल्या चित्रपटांचा ठेवा पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे जतन करण्यात आला आहे. संस्थेच्या प्रेक्षागृहामध्ये दोन वर्षांपूर्वी या चित्रपटांचे प्रदर्शन केले होते. ल्यूमिअर बंधू यांच्या पहिल्या चार-पाच चित्रपटांच्या प्रती ‘सेल्युलॉईड’मध्ये उपलब्ध आहेत.

– प्रकाश मगदूम, संचालक, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments