३ जानेवारीं २०२०,
नविन वर्ष सुरू झालं की कॉलेजमध्ये सुरू होते ती ‘डे’ची लगभग. कॉलज तरूणही अगदी आनंदानं यामध्ये सहभागी होत असतात. ट्रेडिशनल डे, रोझ डे, साडी डे आणि टाय डे असे अनेक ‘डे’ यादरम्यान सेलिब्रेट केले जातात. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये अनोख्या प्रकारे साडी डे आणि टाय डे सेलिब्रेट करण्यात आला. आता याची चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे. फर्ग्युसन कॉलेजमधील तीन मुलांनी साडी नेसत अनोख्या प्रकारे हा डे साजरा केला. मुलांनी साडी आणि मुलींनी टाय सूट करण्याचं ठरवण्यात आलं होतं. आकाश पवार, सुमित होनवडकर आणि ऋषीकेश सानप अशी या तीन मुलांची नावं आहेत. केवळ मुलींनीच साडी परिधान करायची असा काही नियम नसल्याचंही या मुलांनी सांगितलं.
यामागेही एक कहाणी असल्याचं त्यांनी सांगितलं. दोन वर्षांपूर्वी एकानं काही तरूणांना स्त्री पुरूष समानेच्या गोष्टी करता तर साडी नेसून दाखवाल का ? अशी विचारणा केली होती. त्यानंतर या कॉलेजच्या एका विद्यार्थ्यांनं हे आव्हान स्वीकारत साडी परिधान केली होती. त्यावेळी अन्य विद्यार्थ्यांकडून टोमणे मारण्यात आले होते. परंतु यावेळी पुन्हा एकदा या विद्यार्थ्यांनी हे आव्हान स्वीकारत साडी परिधान केल्याचं पहायला मिळालं.