पुण्यातील महात्मा फुले मंडईतील रामेश्वर चौकात तरुणावर कोयत्याने वार करत गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काल मंगळवारी रात्री एका तरुणावर पूर्ववैमनस्यातून कोयत्याने वार करुन गोळीबार करण्यात आल्याचा धक्कादायक घटना घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यात हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. मंडई हा अतिशय गजबजलेला परिसर आहे तरीही असा प्रकार घडल्याने स्थानिकांमध्ये अतिशय भितीचं वातावरण निर्माण झालं आहे.
शेखर शिंदे नावाचा हा तरुण रात्री नऊ वाजता रामेश्वर चौकातून जात होता. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर कोयत्याने वार केले. त्यानंतर त्यांनी पिस्तुलातून गोळीबार केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गंभीर जखमी झालेल्या शेखर शिंदेला तातडीने रुग्णालयात दाखल केलं असून पुढील तपास सुरु आहे.