कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकरी आंदोलनाबाबत आता आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा होऊ लागली आहे. प्रसिद्ध पॉपस्टार रिहाना हिने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर बऱ्याच संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या. यात चित्रपट सृष्टीतील कलाकारांनीही आपली मते मांडली. आता बॉलिवूड आणि हॉलिवूड असा वाद आणखीणच रंगला आहे. अमेरिकन अभिनेत्री अमांडा सर्नीने बॉलिवूडकरांवर टीकास्त्र डागत त्यांना मुर्ख म्हटलं आहे.
रिहानाप्रमाणेच अमांडानेदेखील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर तिलादेखील ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. परंतु, अमांडाने या ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे. इतकंच नाही तर तिने अक्षय कुमार, सचिन तेंडुलकर, करण जोहर, अजय देवगण या सेलिब्रिटींवरदेखील टीकास्त्र डागलं आहे.
“ज्यांनी खरी प्रचार मोहिम सुरु केली आहे, त्या मुर्खांना कामावर कोणी घेतलं आहे? एक असंबंध व्यक्ती भारताचं विभाजन करण्याचं षडयंत्र करत आहे आणि त्यासाठी तिला पैसे मिळत आहेत? जरा तरी विचार करा. निदान यात थोडाफार वास्तववादीपणा ठेवा”, असं ट्विट अमांडाने केलं आहे.
वाचाः VIDEO: मुंबईत भीषण अग्नितांडव, मानखुर्दमध्ये गोडाऊनला आग
अक्षय कुमार, अजय देवगण, करण जोहर, विराट कोहली यांनी ट्विट करत शेतकरी आंदोलनाला दिलेल्या आंतरराष्ट्रीय पाठिंब्याला ‘षडयंत्र’ म्हटलं होतं. त्यावर अमांडाने या बॉलिवूड कलाकारांना प्रत्युत्तर दिलं आहे.