नव्या कृषी कायद्यांविरोधात मागील दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाची चर्चा आता आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील होऊ लागली आहे. प्रसिद्ध पॉपस्टार रिहानाने शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे सध्या रिहाना चर्चेत आहे. यामध्येच गायक, अभिनेता दिलजीत दोसांज याने रिहानाचं कौतूक केलं आहे.
अलिकडेच रिहानाने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत शेतकऱ्यांना पाठिंबा दिला होता. तिच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर एकाच चर्चेला उधाण आलं आहे. अनेकांनी तिला पाठिंबा दिला आहे. तर काहींनी मात्र, तिच्यावर टीकास्त्र डागलं आहे.
‘आपण याविषयी का विचार करत नाही’ असं ट्विट रिहानाने केलं होतं. सोबतच तिने ‘#FarmersProtest’ असा हॅशटॅगही वापरला आहे. तिचं हे ट्विट पाहून दिलजीतने तिचं कौतुक केलं आहे. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये रिहानाचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत त्याने रन दिस टाउन हे गाणं बॅकग्राऊंडला लावलं आहे.
दरम्यान, दिलजीतने केलेल्या या पोस्टची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. दिलजीत सातत्याने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत आहे. आतापर्यंत त्याने या शेतकऱ्यांना मदतदेखील केली आहे. तर, रिहानाने केलेल्या ट्विटनंतर अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेलिब्रिटींनी याविषयी भाष्य केल्याचं पाहायला मिळालं आहे.