Sunday, June 16, 2024
Homeताजी बातमीनागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी ‘सी-व्हिजिल’ ॲपवर नोंदविण्याची सुविधा

नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी ‘सी-व्हिजिल’ ॲपवर नोंदविण्याची सुविधा

आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे आणि निवडणूक प्रक्रीया पारदर्शक होण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने नागरिकांना ‘सी-व्हिजिल’ ॲपवर मतदार संघात होत असलेल्या आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारी नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

जिल्ह्यातील चिंचवड व कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून २६ फेब्रुवारी २०२३ रोजी मतदान होणार आहे. नागरिकांना दोन्ही मतदारसंघातील आचारसंहिता उल्लंघन करणाऱ्या अनुचित प्रकारांची तक्रार या ॲपच्या माध्यमातून थेट ऑनलाईन पद्धतीने करता येईल. यामध्ये अवैध जाहिरात फलक, मतदारांना पैसे वाटप, दारु वाटप, भेट वस्तू किंवा आमिष दाखवणे, कोणत्याही प्रकारचे शस्त्र दाखवून धमकावणे आदी प्रकारच्या तक्रारींचा समावेश आहे.

सी-व्हिजिल ॲपमुळे आलेल्या तक्रारींवर तातडीने कारवाई करणे सोईचे झाले आहे. निवडणूक प्रशासनाने यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार ठेवली आहे. या माध्यमातून नागरिक स्वतंत्र व निष्पक्षपाती निवडणुकांच्या संचालनासाठी सक्रिय आणि जबाबदार भूमिका बजावू शकतात. या ॲपचा वापर मतदानाच्या दुसऱ्या दिवसापर्यंत करता येईल.

ॲपद्वारे तक्रारींचे छायाचित्र अथवा व्हिडीओ पुरावा म्हणून थेट अपलोड करण्याची सुविधा आहे. ॲप वापरकर्त्यास आपली ओळख लपवून सुद्धा तक्रार नोंदविण्याचा पर्याय आहे. यामध्ये मोबाईल नंबर आणि इतर प्रोफाइल तपशील ॲप प्रणालीवर पाठवले जात नाहीत. त्यामुळे निनावी तक्रारींच्या बाबतीत, तक्रारकर्त्यास पुढील स्थिती संदेश मिळणार नाहीत, मात्र त्याच्या तक्रारीवर कारवाई मात्र करण्यात येईल.

तक्रार नोंदवल्यानंतर पाच मिनीटामध्ये ही माहिती भरारी पथकाला पाठवली जाते. भरारी पथकाकडून तातडीने याबाबत चौकशी करून निवडणूक निर्णय अधिकारी यांना अहवाल सादर केला जातो आणि संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी तातडीने त्याच्यावर कारवाई करतात. पोट निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून नोंद झालेल्या ५९ तक्रारींचे निरसन करण्यात आले आहे, अशी माहिती समन्वय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सचिन इथापे यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments