अनेक दिवसांपासून फेसबुकची पोहोच कमी करून, त्यांना इशारा दिल्यानंतर आता रशियाने देशात फेसबुकवर पूर्णतः बंदी लादली आहे. रशियन सरकारच्या सेन्सॉरशिप एजन्सी रॉस्कोमन्डझोरने फेसबुक रशियन मीडियासोबत भेदभाव करत असल्याचा आरोप केला आहे. द कीव इंडिपेंडंटच्या अहवालानुसार रशियन सरकारच्या सेन्सॉरशिप एजन्सीने फेसबुकवर बंदी घालत असल्याचे जाहीर केले आहे. तर याउलट फेसबुकने रशियावर लाखो लोकांना विश्वासार्ह माहिती नाकारल्याचा आरोप केला आहे.
फेसबुकनंतर ट्विटरवरही कारवाई…
फेसबुकवर बंदी घातल्यानंतर रशियाने ट्विटरवारही कारवाई केली आहे. रशियामध्ये ट्विटरच्या पोहोचवर प्रतिबंध घालण्यात आला आहे. असे केल्याने लोक ट्विटरवर प्रवेश करू शकतात परंतु इतरांचे ट्विट पाहू शकणार नाहीत.
शुक्रवारी बंद झाल्या सोशल मीडिया साइट्स…
रशियाविरुद्ध नकारात्मक माहिती किंवा बातमी देणाऱ्या मीडिया वेबसाइट्स, फेसबुकसारख्या समाजमाध्यमांना रशियामध्ये बंदी घालण्यात आली होती. लोक या साइट्सपर्यंत पोहचू शकत नव्हते. शुक्रवारी रशियामध्ये फेसबुक आणि अनेक मीडिया वेबसाइट्स अंशतः बंद होत्या. तज्ञांचे असे मानणे आहे की युक्रेनमध्ये लढाई वाढत असताना, अधिकाऱ्यांनी टीका करणाऱ्या आवाजांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मॉस्कोमधील एएफपी पत्रकार फेसबुकसोबतच आऊटलेट्स मेडूजा, ड्यूश वेले, आरएफई-आरएल आणि बीबीसीच्या रशियन साइट्सपर्यंत पोहोचू शकत नव्हते. मॉनिटरिंग एनजीओ ग्लोबलचेकने देखील सांगितले की साइट्स अंशतः बंद आहेत. याच क्रमात फेसबुकवर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. तर ट्विटरच्या पोहोचवर प्रतिबंध घालण्यात आले आहेत.
खोट्या बातम्यांविरोधात तयार करण्यात आला कायदा…
रशियन संसदेने शुक्रवारी बनावट बातम्यांबाबत कठोर कायदा जाहीर केला. युक्रेन युद्धादरम्यान रशियन सैन्याविरोधात खोट्या बातम्या पसरवल्याच्या मुद्द्यावरून रशियन संसदेने हा निर्णय घेतला आहे. संसदेत मंजूर झालेल्या या नव्या कायद्यात लष्कराविरोधात जाणूनबुजून खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना १५ वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद करण्यात आली आहे.


