आगामी महापालिका निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकती- सूचनांचा सुनावणी अहवाल पाच मार्च रोजी सादर होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने तशी मुदतवाढ महापालिकेला दिली आहे. दरम्यान, प्रभाग रचनेत काही प्रमाणात बदल होतील असा दावा महापालिकेच्या निवडणूक शाखेतील अधिकाऱ्यांनी केला आहे.
निवडणूक शाखेकडून १ फेब्रुवारी रोजी प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली होती. त्यावर जवळपास साडेतीन हजार हरकती सूूचना नोंदविण्यात आल्या. हरकती सूचनांवर सुनावणी प्रक्रिया गेल्या आठवडय़ात पूर्ण झाली. त्याबाबतचा अहवाल दोन मार्च रोजी राज्य निवडणूक आयोगाला सादर करणे अपेक्षित होते. मात्र अहवाल सादर करण्यास पाच मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. महापालिकेच्या अहवालानंतर अंतिम प्रभागरचना जाहीर होईल आणि त्यानंतर आरक्षण सोडत काढली जाईल.
प्रभाग रचनेवर घेण्यात आलेल्या सुनावणी प्रक्रियेसंदर्भात सध्या अधिकाऱ्यांचे बैठक सत्र सुरू झाले आहे. बदलांच्या शिफारशींचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला पाठविण्यात येणार आहे. शिफारशी स्वीकारण्याचा किंवा फेटाळण्याचा अधिकार आयोगाला आहे. मात्र प्रभाग रचनेमध्ये किमान पंधरा ते वीस टक्के बदल होतील, असा दावा निवडणूक शाखेकडून करण्यात आला आहे.


