३० नोव्हेंबर २०२०,
शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचा प्रचार टिपेला पोहोचला असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्ष वेगवेगळ्या ‘आयडिया’ लढवत आहेत. या सगळ्या गडबडीत औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या आवाजातील एक बनावट ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळं खळबळ उडाली आहे. सुप्रिया सुळे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून तात्काळ याबाबत खुलासा केला आहे.
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण हे रिंगणात आहेत. सुप्रिया सुळे या चव्हाण यांच्याविरोधात प्रचार करत असल्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. सुप्रिया सुळे यांच्या नावानं फेक मोबाइल नंबरही शेअर केला जात आहे. त्याद्वारे ही क्लिप शेअर केली जात आहे. सुप्रिया सुळे यांनी ह्या सर्व प्रकाराचा तीव्र निषेध केला आहे. विरोधकांचा हा रडीचा डाव असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
आपल्या फेसबुक लाइव्हमध्ये सुप्रिया सुळे म्हणतात, ‘मला माझ्या काही सहकाऱ्यांचे तसेच, वर्तमानपत्र व चॅनेलमधून फोन आले. उस्मानाबाद आणि लातूरच्या काही भागामध्ये माझ्या नावाचा, आवाजाचा आणि खोटा मोबाइल नंबर वापरून व लिहून काही लोक प्रचार करत आहेत. त्याचा गैरवापर होत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात व समाजकारणात इतकी पातळी सोडून विरोधक प्रचार करत आहेत, हे खरंच दुर्दैवी आहे. मी तातडीनं पोलीस यंत्रणेची मदत घेतलेली आहे. त्याचबरोबर निवडणूक आयोगाशीही संपर्क साधलेला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनाही मी तातडीनं संपर्क साधलेला आहे. विरोधक जो रडीचा डाव खेळत आहेत, त्याची कल्पना मी सतीश चव्हाण यांना दिली आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
‘पदवीधरची ही निवडणूक आहे. कुठलाही विषय राहिला नसल्यामुळं विरोधक पातळी सोडून माझ्या नावाचा गैरवापर करून, बनावट अकाऊंट, बनावट नंबर वापरून आज ते प्रचार करत आहेत. मी या प्रकाराचा निषेध करते. हा यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे. इथे हा रडीचा डाव खेळणं चुकीचं आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला हे शोभणारं नाही. मला कोणावरही आरोप करायचा नाही. पण तंत्रज्ञानाचा असा गैरवापर करणं चुकीचं आहे. तुमच्याकडं बोलण्यासारखं काही नसेल तर बोलू नका. गप्प राहा,’ असं त्यांनी विरोधकांना सुनावलं आहे. हे करणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे, असा आमचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीनं आम्ही तक्रार केली आहे, असं सांगतानाच, ‘अशा खोट्या लोकांवर विश्वास ठेवू नका,’ असं आवाहन त्यांनी मतदारांना व कार्यकर्त्यांना केलं आहे.