Tuesday, April 21, 2026
Homeताजी बातमीनवोदय परीक्षेत पिंपरी चिंचवड महानगरपालिका शाळांची उत्कृष्ट कामगिरी  ३२७ पैकी १७४ विद्यार्थी पात्र

नवोदय परीक्षेत पिंपरी चिंचवड महानगरपालिका शाळांची उत्कृष्ट कामगिरी  ३२७ पैकी १७४ विद्यार्थी पात्र

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी यंदाच्या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत उल्लेखनीय आणि अभिमानास्पद यश संपादन केले आहे. इयत्ता पाचवीतील एकूण ३२७ विद्यार्थी या स्पर्धात्मक परीक्षेसाठी बसले होते, त्यापैकी तब्बल १७४ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. 

या उल्लेखनीय यशाबद्दल महापौर रवि लांडगे, उप महापौर शर्मिला बाबर, शिक्षण समिती सभापती रवीना आंगोळकर, आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, उपायुक्त ममता शिंदे, प्रशासन अधिकारी संगीता बांगर तसेच शिक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे आणि शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. 

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा ही अत्यंत स्पर्धात्मक स्वरूपाची परीक्षा असून, विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेची, तार्किक विचारशक्तीची आणि शैक्षणिक पायाभरणीची कसोटी पाहणारी आहे. अशा कठीण परीक्षेत महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश विशेष उल्लेखनीय आहे.

या यशामागे शाळांमधील शिक्षकांचे नियोजनबद्ध आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने शाळेतच विशेष तयारी करून घेण्यात आली. अभ्यासक्रमानुसार सखोल मार्गदर्शन देण्यात आले तसेच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि परीक्षेचा सराव होण्यासाठी नियमित परीक्षा सराव परीक्षा देखील घेण्यात आल्या. या  परीक्षांमुळे विद्यार्थ्यांना परीक्षेचे स्वरूप समजले, वेळेचे नियोजन करता आले आणि आपली तयारी अधिक प्रभावी करता आली.

महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांनी नवोदय परीक्षेत मिळवलेले यश हे आपल्या शिक्षण व्यवस्थेच्या गुणवत्तेचे प्रतीक आहे. शिक्षकांनी घेतलेली मेहनत, सराव परीक्षांद्वारे केलेली तयारी आणि विद्यार्थ्यांची चिकाटी यामुळे ही कामगिरी शक्य झाली आहे. भविष्यातही अधिकाधिक विद्यार्थ्यांना अशा स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम करण्यावर आम्ही भर देणार आहोत.- रवीना अंगोळकर, सभापती , शिक्षण समिती, पिंपरी चिंचवड महापालिका

विद्यार्थ्यांसाठी शाळास्तरावर केलेली नियोजनबद्ध तयारी, सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि सराव परीक्षा यांचा सकारात्मक परिणाम नवोदय परीक्षेच्या निकालातून दिसून येत आहे. महानगरपालिका शिक्षण विभाग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि स्पर्धा परीक्षांतील यशासाठी सातत्याने प्रयत्नशील राहील.- ममता शिंदे, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

जवाहर नवोदय परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची भक्कम तयारी व्हावी यासाठी विशेष मार्गदर्शन सत्रे आणि मॉक परीक्षा आयोजित करण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांनी या संधीचा योग्य उपयोग करून उत्कृष्ट यश मिळवले आहे. ही यशस्वी कामगिरी सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांच्या संयुक्त प्रयत्नांचे फलित आहे.

संगीता बांगर, प्रशासन अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments