शहरा शेजारील गावात बेकायदेशीर बांधकामे, रस्त्यांचे प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे व्यवस्थित विकास होण्यासाठी महानगरपालिका, नगरपालिका असणे आवश्यक असून देहू, आळंदी, चाकण, राजगुरूनगर मिळून एक महानगरपालिका करता येईल का याबाबत विचार सुरू आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार म्हणाले.
उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते लोहगाव येथे लोहगाव- वाघोली समान पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन, धानोरी सर्वे नं. ७ येथे बांधण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन झाले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार सुनील टिंगरे, चेतन तुपे, माजी आमदार रामभाऊ मोझे, मनपा आयुक्त विक्रमकुमार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, पांडुरंग खेसे, सतीश म्हस्के, स्वप्नील पठारे आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, लोहगावच्या समस्या सोडविण्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्यात येतील. संरक्षण विभागाच्या हद्दीत असलेला रस्ता बाहेरुन काढून घेतल्यास येथील विमानतळाचे विस्तारीकरण करून मोठी आंतरराष्ट्रीय विमाने उतरू शकतील. कोणत्याही विकास प्रकल्पांना जागा आवश्यक असते. जागेच्या मूल्यांकनाबाबत काही अडचणी असल्यास नोंदणी विभागाशी बोलून मार्ग काढण्यात येईल, असेही ते म्हणाले.
पाण्याच्या समस्येबाबत बोलतांना श्री.पवार म्हणाले की, पुण्याची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात रोजगाराच्या शोधात लोक येतात. त्यांना पाणी, आरोग्य, निवारा आदी सुविधा पुरवाव्या लागतात. त्यामुळे इंदापूर, हवेली, दौंड, पुरंदर तालुक्यातील शेतीला पाणी कमी पडत आहे. पाणी बचतीसाठी कालव्याऐवजी बोगदा करण्याचे नियोजन आहे. पुण्याच्या पाण्यासह, शेतीला पाणी मिळावे म्हणून टाटाच्या धरणातून पाणी मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वापरलेले सांडपाणी प्रक्रिया करून शेतीला देण्यायोग्य करण्यासाठी आवश्यक तेथे एसटीपी उभारण्यात येथील, असेही श्री. पवार म्हणाले.
नागरिकांना सुविधा देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीत भरीव वाढ केली आहे. लोहगाव येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी पीएमपीएमएलची बीआरटी लेन बंद केली. तसेच कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून उड्डाणपुलाची आवश्यकता आहे. रिंग रोड झाल्यानंतर हा प्रश्न बऱ्याच प्रमाणात सुटेल, असेही ते म्हणाले.
राज्य शासन नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहे. राज्यात नोकरभरती मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे. त्यासोबतच ठिकठिकाणी रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून विविध आस्थापनांमध्ये युवांना रोजगार मिळावा म्हणून प्रयत्न सुरू आहेत. राज्यात नवीन युवा धोरण बनविण्यात येणार आहे. आयटीआय मध्ये रोजगारक्षम नवीन अभ्यासक्रम सुरू केले आहेत, त्याचा युवकांना फायदा होईल, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.
राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी प्रकल्प संनियंत्रण समिती केली असून त्या माध्यमातून मेट्रो, रिंग रोड, मोठी रुग्णालये, बंदरे, समुद्र किनारी मार्ग आदी विविध विषयांच्या प्रकल्पांचा आढावा देऊन त्यांना गती दिली जात आहे. राज्यभरात टिकाऊ रस्ते व्हावेत म्हणून ते डांबरी ऐवजी काँक्रिटचे करण्याचे प्रयत्न आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली.