काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेले वादग्रस्त वक्तव्य आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाषण यावर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना जोरदार टीका केली. राजकारणाचा स्तर किती घसरला आहे, हे लोकांनी लक्षात घ्यावे, असे आवाहन करायलाही ते विसरले नाहीत. चंद्रकांत पाटील यांनी यावेळी भाजप-मनसे युतीवरही सूचक वक्तव्य केले. जाणून घेऊयात पाटील काय म्हणाले.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, नाना पटोले यांची शारीरिक आणि मानसिक तपासणी करावी लागेल. नाना पटोले यांचा हेतू काय आहे. देशातील सर्वोच्च पदावरच्या नेत्याला काही बोलले की प्रसिद्धी मिळते, अशी त्यांच्या नेत्याची पॉलिसी आहे. ते तेच फॉलो करतायत. नाना पटोले यांचा निषेध करतो. राजकारणाचा स्तर किती घसरला आहे, हे लोकांनी लक्षात घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांवरही शरसंधान केले. उद्धव ठाकरे यांच्या सगळ्या भाषणात थयधयाट आहे. नैराश्य व्यक्त करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भाषा योग्य नसल्याचे ते म्हणाले. नगरपंचायतीच्या निकालाच विश्लेषण ही शिवसेनेला पटलं नाही. शिवसेनेला विचार करायला लावणारी स्थिती आहे. आपल्या पक्षाचा ऱ्हास होत चालला आहे तेव्हा असा थयथयाट केला जातोय, अशी टीकाही त्यांनी केली.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, तुम्ही काहीही करा आणि म्हणा ईडी-सीबीआय बाजूला ठेवा. जर कर नाही त्याला डर कशाला. नाचता येईना अंगण वाकडे अशी अवस्था झाली आहे, असे म्हणत त्यांनी विरोधकांवर टीका केली. पडळकर काय कोणत्या एका तालुक्याचे नेते नाहीत. सगळ्या राज्यात त्यांचा वावर आहे. पंढरपूरच्या पोटनिवडणूक यशात पडळकर, खोत हे सुद्धा असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पाटलांनी खासदार इम्तियाज जलील यांच्यावरही औरंगाबादमधील पुतळाप्रकरणावरून टीका केली. जलील हे खासदार आहेत. त्यांना काय करावं हे सांगण्याचा अधिकार नाही. प्रशासन निर्णय घेईल, असे सांगायलाही ते विसरले नाहीत. शिवाय यावेळी त्यांनी भाजप-मनसे युतीचा कसलाही प्रस्ताव नसल्याचे सांगितले.