Tuesday, February 18, 2025
Homeताजी बातमीकसब्यात फडणवीसांचे जातीने लक्ष तरीही प्रचारात महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकरच पुढे

कसब्यात फडणवीसांचे जातीने लक्ष तरीही प्रचारात महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकरच पुढे

भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या पोटनिवडणुकीसाठी भाजपने टिळक यांच्या घरात उमेदवारी न देता हेमंत रासने यांना पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळे भाजपला पक्षांतर्गत नाराजीचा फटका बसत असल्याच्या चर्चा आहेत. त्यासोबतच कसबा विधानसभा मतदारसंघात बहुसंख्य असलेला ब्राह्मण समाज देखील यामुळे नाराज आहे. त्यामुळे त्याचाही फटका या निवडणुकीत भाजपला बसेल, अशा चर्चा आहेत. भरीस भर म्हणजे आनंद दवे यांनीही भाजपविरोधात रान पेटवलं आहे.

एकीकडे भाजपला आपल्या पारंपरिक मतदारांची नाराजी आणि पक्षांतर्गत नाराजीचा फटका बसत असताना दुसरीकडे काँग्रेसने मात्र रासने यांच्या विरोधात अतिशय तगडा उमेदवार मैदानात उतरवला आहे. २००९ आणि २०१४ साली कसब्यात एक हाती राज्य असणाऱ्या गिरीश बापट यांना निवडणुकीत घाम फोडणाऱ्या रवींद्र धंगेकर यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. तगडा जनसंपर्क हे रवींद्र धंगेकर यांचं बलस्थान असल्याने भाजपला ही निवडणूक गांभीर्याने घ्यावी लागत आहे.

कसब्यात फडणवीसांनी जातीने लक्ष घातलंय!

उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच रवींद्र धंगेकर यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. मात्र दुसरीकडे भाजप अतिशय सावध पाऊल उचलताना दिसत आहे. कसब्याची निवडणूक सोपी नसल्याचं लक्षात आल्याने भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह तब्बल पाच मंत्री कसब्यात तळ ठोकून आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातून माजी नगरसेवकांची फौज देखील कसब्यात दाखल झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आता ही निवडणूक आपल्या हातात घेतली असून निवडणुकीतील प्रत्येक बारीक गोष्टीवर ते स्वतः लक्ष ठेवून आहेत.

कसब्यात निवडणूक अवघड दिसत असल्याने देवेंद्र फडणवीस यांनी आजारी असलेल्या गिरीश बापट यांची भेट घेतली आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी गिरीश बापट यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. इतकंच काय तर शिवाजीनगरचे भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांनी नेते आणि पदाधिकाऱ्यांची तब्बल सात तास बैठक घेतली. तत्पूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील दोन बड्या उद्योगपतींची चर्चा केली. वीस मिनिटं या उद्योगपतींची बंद दाराआड फडणवीस यांनी चर्चा केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments