वंचितचा पाठिंबा बंडखोर राहुल कलाटे यांना असला तरी वंचित आणि शिवसेनेची युती असल्याने त्यांचे कार्यकर्ते माझा प्रचार, काम करतील, असा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार नाना उर्फ विठ्ठल काटे यांनी व्यक्त केला आहे. ते पिंपरी- चिंचवडमधील पिंपळे सौदागर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आज देखील नाना काटे यांना विविध ४० संघटनांनी पाठिंबा दिला आहे. यामुळे आमची आणखी ताकद वाढली असल्याचे देखील काटे यांनी सांगितले आहे.
नाना काटे म्हणाले की, महाविकास आघाडीकडून माझी उमेदवारी जाहीर झाली तेव्हापासून अनेक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. आज देखील ४० संघटनांनी मला पाठिंबा दिला. त्या संघटनांचे कार्यकर्ते माझा प्रचार करत असून कामाला लागले आहेत. केवळ पत्राद्वारे पाठिंबा दिला नाही. वंचितचा पाठिंबा अपक्ष, बंडखोर राहुल कलाटे यांना मिळाला असला तरी वंचित शिवसनेनेसोबत आहे, त्यांची युती आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी महाविकास आघाडी आहे. वंचित शिवसनेसोबत असल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते देखील माझ्यासोबत असतील आणि माझा प्रचार करतील. अनेक संघटना ताकदीनिशी निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत, असा विश्वास नाना काटे यांनी व्यक्त केला आहे.