Tuesday, February 11, 2025
Homeताजी बातमीमुदत संपल्यानंतरही निगडीतील भुयारी मार्गाचे काम संपेना…

मुदत संपल्यानंतरही निगडीतील भुयारी मार्गाचे काम संपेना…

निगडी हे पिंपरी-चिंचवड शहराचे प्रवेशद्वार आणि वर्दळीचे ठिकाण आहे. त्यामुळे पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्ग बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. बी. के. खोसे या ठेकेदार कंपनीकडून या मार्गाचे काम करण्यात येत आहे. या भुयारी मार्गाच्या कामासाठी १५ महिन्यांची मुदत होती. ती ८ जूनला संपली. मुदत संपल्यानंतरही काम संथगतीने सुरू असून आत्तापर्यंत केवळ ३० टक्के पूर्ण झाले आहे.

नागरिकांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्यासाठी पुणे-मुंबई महामार्गावरील निगडी येथील पादचारी भुयारी मार्गाच्या कामाची मुदत संपूनही काम पूर्ण झालेले नाही. या मार्गाचे आतापर्यंत केवळ तीस टक्केच काम झाले असून, नागरिकांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे.

वाहतूक पोलिसांनी दोन्ही बाजूने मार्ग बंद करून काम करण्यास परवानगी न दिल्याने या कामास विलंब झाल्याचा प्रशासनाचा दावा आहे. त्यामुळे ठेकेदाराला दोन वेळा तीन महिन्यांची मुदतवाढ दिली. त्यानुसार ८ सप्टेंबर २०२३ पर्यंत काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तीन महिन्यांच्या मुदतवाढीत काम पूर्ण न झाल्यास संबंधित ठेकेदाराला दररोज दोन हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार असल्याचे महापालिकेचे सह शहर अभियंता प्रमोद ओंभासे यांनी सांगितले.

भुयारी मार्गाच्या रखडलेल्या कामामुळे सातत्याने अपघात होत आहेत. गॅस वाहतूक करणारा मोठा टँकर उलटला होता. विद्यार्थी, नागरिकांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. प्रशासनाने तातडीने काम पूर्ण करावे. –अमित गावडे, स्थानिक माजी नगरसेवक

भुयारी मार्गाचे काम अतिशय संथगतीने सुरू असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सातत्याने अपघात होत आहेत. एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काम मुदतीत पूर्ण न केल्याबद्दल ठेकेदारावर दंडात्मक कारवाई केली पाहिजे. प्रशासनाने तत्काळ काम पूर्ण करावे अन्यथा आंदोलन केले जाईल. – सचिन चिखले, स्थानिक माजी नगरसेवक

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments