Sunday, June 15, 2025
Homeआंतरराष्ट्रीययुरो कप आजपासून उपांत्यपूर्व फेरीचा थरार, स्वित्झर्लंडची गाठ माजी विजेत्या स्पेनशी

युरो कप आजपासून उपांत्यपूर्व फेरीचा थरार, स्वित्झर्लंडची गाठ माजी विजेत्या स्पेनशी

२ जूलै २०२१,
युरो कप फुटबॉल स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीला शुक्रवारपासून प्रारंभ होत असून, स्वित्झर्लंडची माजी विजेत्या स्पेनशी गाठ पडणार आहे.जागतिक क्रमवारीत स्पेन सहाव्या, तर स्वित्झर्लंड तेराव्या क्रमांकावर आहे. यापूर्वी, हे संघ बावीस वेळा आमनेसामने आले आहेत. त्यात सोळा वेळा स्पेनने, तर एकदा स्वित्झर्लंडने बाजी मारली आहे. पाच लढती बरोबरीत सुटल्या. स्पेनचे पारडे जड मानले जात असले, तरीही स्वित्झर्लंडला कमी लेखून चालणार नाही. गेल्या वर्षअखेरीस नेशन्स लीगमध्ये या संघांत झालेल्या लढतींत जबरदस्त चुरस पाहायला मिळाली आहे. त्यातील एक लढत बरोबरीत सुटली होती, तर एक लढत स्पेनने १-० ने जिंकली होती. युरो कपच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत स्वित्झर्लंडने जगज्जेत्या फ्रान्सला धक्का दिला आहे. साहजिकच त्यांचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. स्वित्झर्लंड आणखी एक सनसनाटी विजय नोंदविणार की, स्पेन बाजी मारून उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित करणार, याबाबत औत्सुक्य आहे.

स्पेनला फेव्हरिट मानले जात असले, तरीही आम्हाला आगेकूच करायची आहे. आम्हाला मैदानावर विजयाची भूक दाखवून द्यावी लागणार आहे. मला विश्वास आहे, की खेळाडू तसे करतील. आम्हाला झाकाची उणीव जाणवेल. मात्र, स्पेनला नमविण्यासाठी प्रत्येक खेळाडूकडून थोडे अधिक योगदान आवश्यक आहे.- व्लादीमिर पेटकोविच, स्वित्झर्लंडचे प्रशिक्षक कोणताही संघ असो आम्ही येथे जिंकण्यासाठी आलो आहोत. आम्हाला स‌र्वोत्तम संघांना सामोरे जावे लागणार आणि पराभूत करावे लागणार आहे. – युनाय सिमॉन, स्पेनचा गोलरक्षक बेल्जियम-इटली आमनेसामने

म्युनिक : युरो कपच्या दुसऱ्या उपांत्यपूर्व लढतीत बेल्जियम आणि इटली हे संघ आमनेसामने येत आहेत. जागतिक क्रमवारीत बेल्जियम संघ अव्वल, तर इटली संघ सातव्या क्रमांकावर आहे. हे संघ आतापर्यंत बावीस वेळा आमनेसामने आले आहेत. त्यात चौदा वेळा इटलीने, तर चार लढतींत बेल्जियमने बाजी मारली आहे. चार लढती बरोबरीत सुटल्या आहेत. गेल्या युरो कपमध्ये इटलीने बेल्जियमला हरविले होते. ‘त्या’ पराभवाचे उट्टे काढून बेल्जियम उपांत्यपूर्व फेरी गाठणार की, इटली पुन्हा एकदा बाजी मारणार, याबाबत औत्सुक्य आहे.

सामने

स्वित्झर्लंड वि. स्पेन, सेंट पीटर्सबर्ग
वेळ : रात्री साडेनऊपासून
…..

बेल्जियम वि. इटली, म्युनिक
वेळ : रात्री साडेबारापासून

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments