पिंपरी चिंचवडचा झपाट्याने होत असलेला विस्तार आणि वाढत्या वीज ग्राहकांचा विचार करून शहरात स्वतंत्र महावितरण मंडल कार्यालय स्थापन करण्याची मागणी पिंपरी चिंचवड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनने केली आहे. या संदर्भातील निवेदन असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत महावितरणचे मानव संसाधन विभागाचे कार्यकारी संचालक राजेंद्र पवार यांना भेटून दिले.
सध्या पिंपरी आणि भोसरी ही दोन विभागीय कार्यालये गणेशखिंड मंडल कार्यालय, पुणे यांच्याशी संलग्न असून या माध्यमातून दहा लाखांहून अधिक वीज ग्राहकांना सेवा दिली जाते. वाढत्या लोकसंख्येमुळे ही संख्या सतत वाढत आहे.
याशिवाय चाकण, आळंदी, तळेगाव, वडगाव, लोणावळा या भागांची सेवा राजगुरुनगर विभागीय कार्यालय पाहते, तर मंचर, नारायणगाव, आंबेगाव परिसर पुणे ग्रामीण मंडल कार्यालयाशी संलग्न आहे. ही मंडल कार्यालये भौगोलिकदृष्ट्या लांब असल्याने ग्राहकांना मोठ्या अंतराचा सामना करावा लागतो, अशी तक्रार संघटनेकडून करण्यात आली.
भोसरी, पिंपरी, राजगुरुनगर आणि मंचर विभाग एकत्र घेऊन पिंपरी चिंचवडमध्येच नव्या मंडल कार्यालयाची स्थापना केल्यास ग्राहकांचे अंतर निम्म्याने कमी होऊन सेवा दर्जा सुधारेल, असा दावा संघटनेचे अध्यक्ष ॲड. गिरीश बक्षी आणि उपाध्यक्ष मनोज हरपळे यांनी केला. मंडल कार्यालय स्थापनेसाठी सर्व निकष पूर्ण होत असून शहराच्या विकासासाठी ही गरज तातडीची असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या मागणीवर कार्यकारी संचालक राजेंद्र पवार यांनी सकारात्मक विचार करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याचे असोसिएशनने सांगितले.


