८ जुलै २०२१,
यूरो कप २०२० स्पर्धेतील उपांत्य फेरीत डेन्मार्कला नमवत इंग्लंडनं इतिहास रचला आहे. यूरो चषकाच्या अंतिम फेरीत पहिल्यांदाच इंग्लंडनं जागा मिळवली आहे. इंग्लंडनं डेन्मार्कचा २-१ ने पराभव करत अंतिम फेरी गाठली. पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी प्रत्येकी एक-एक गोल नोंदवला. त्यानंतर दुसऱ्या सत्रात विजयी गोल मारण्यासाठी दोन्ही संघांची धडपड सुरु होती. मात्र ९० मिनिटांचा खेळ संपला तरी दोन्ही संघांना विजयी गोल मारता आला नाही. त्यामुळे सामन्याच्या निकालासाठी अतिरिक्त वेळ देण्यात आला. अतिरिक्त वेळेत इंग्लंडने २-१ ने आघाडी घेतली. हॅरी केननं अतिरिक्त वेळेतील १४ मिनिटाला म्हणजेच १०४ व्या मिनिटाला गोल झळकावला. त्यानंतर डेन्मार्कच्या संघाला बरोबरी साधण्यात अपयश आलं. आता अंतिम फेरीत इंग्लंडचा सामना इटलीसोबत असणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.
पहिलं सत्र
पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी १-१ गोल करत बरोबरी साधली आहे. पहिल्या सत्रातील ३० व्या मिनिटाला डेन्मार्कनं १-० ने आघाडी घेतली होती. डेन्मार्कच्या मिकेल डॅम्सगार्डनं गोल झळकावत संघाला आघाडी मिळवून दिली. फ्री किक मिळाल्यानंतर डॅम्सगार्डनं त्या संधीचं सोनं केलं. २५ यार्डवरून त्याने गोल झळकावला. त्यामुळे इंग्लंडवर दडपण वाढलं होतं. बरोबरी साधण्यासाठी इंग्लंडच्या खेळाडूंची धडपड सुरु होती. डेन्मार्कचा आनंद फार काळ टिकला नाही. ९ मिनिटांनी म्हणजेच ३९ व्या मिनिटाला डेन्मार्कच्या सायमननं स्वगोल करत इंग्लंडचं दडपण दूर केलं. पहिल्या सत्रात बॉलवर इंग्लंडचं वर्चस्व दिसून आलं. पहिल्या सत्रात जास्तीत जास्त वेळ म्हणजेत ६१ टक्के बॉल इंग्लंडच्या ताब्यात होता. तर ३९ टक्के बॉल हा डेन्मार्कच्या ताब्यात होता. इंग्लंडची पास अचूकता ही ८६ टक्के होती, तर डेन्मार्कची पास अचूकता ही ८१ टक्के होती. दोन्ही संघांना प्रत्येकी एक एक कॉर्नर मिळाला होता. या सामन्यासाठी मैदानात इंग्लंडनं ४-२-३-१ अशी, तर डेन्मार्कनं ३-४-३ अशी व्यूहरचना आखली आहे.
दुसरं सत्र
दुसऱ्या सत्रातही बॉलवर इंग्लंडचं वर्चस्व होतं. दुसऱ्या सत्रात इंग्लंडच्या ताब्यात जास्तीत जास्त म्हणजेच ५७ टक्के बॉल होता. तर डेन्मार्कच्या ताब्यात ४३ टक्के बॉल होता. इंग्लंडनं पहिलं सत्र आणि दुसरं सत्र मिळून एकूण ५१२ वेळा बॉल एकमेकांकडे पास केला. पास अचूकता ही ८६ टक्के होती. तर डेन्मार्के ३९७ वेळा बॉल पास केला. यात पास अचूकता ८१ टक्के होती. या सत्रात इंग्लंड आणि डेन्मार्कच्या एका खेळाडूला मैदानात गैरवर्तन केल्याने पिवळं कार्ड दाखवण्यात आलं.
इंग्लंडने साखळी फेरीत क्रोएशिया आणि चेक रिपब्लिक संघाला पराभवाची धुळ चारली आहे. तर स्कॉटलँड विरुद्धचा सामना बरोबरीत सुटला होता. बाद फेरीत जर्मनीचा २-० ने पराभव करत इंग्लंडने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. उपांत्यपूर्व फेरीत इंग्लंडने युक्रेनचा ४-० ने धुव्वा उडवला. त्यानंतर उपांत्य फेरीत डेन्मार्कला २-१ ने पराभूत केलं. आता अंतिम फेरीत इंग्लंडची इटलीशी गाठ आहे.