३० जून २०२१,
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे (सीओईपी) आणि निगडी येथील पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पीसीओई) या स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये आता अभियांत्रिकीचे अभ्यासक्रम मराठी माध्यमातून शिकता येणार आहेत. सावित्रीबाई फु ले पुणे विद्यापीठाकडून या दोन महाविद्यालयांच्या मिळून मराठी माध्यमातील चार अभियांत्रिकी अभ्यासक्रमांना मान्यता दिली आहे.
नव्या शैक्षणिक धोरणाच्या पाश्र्वभूमीवर अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने प्रादेशिक भाषांतून अभियांत्रिकी अभ्यासक्रम उपलब्ध करण्याची घोषणा के ली होती. तसेच महाविद्यालयांकडून प्रादेशिक भाषांतील अभ्यासक्रमांबाबत प्रस्ताव मागवले होते. त्यात राज्यातून सीओईपी आणि पीसीओई या दोन महाविद्यालयांनी मराठी माध्यमातून अभ्यासक्रमासाठीचा प्रस्ताव एआयसीटीईकडे दिला आहे. तसेच सावित्रीबाई फु ले पुणे विद्यापीठाच्या अधिकार मंडळाकडेही मराठी अभ्यासक्रमांच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्यानुसार विद्यापीठाकडून सीओईपीच्या तीन आणि पीसीओईच्या एका अभ्यासक्रमाला मान्यता दिल्याची माहिती विद्यापीठाचे उपकु लसचिव एम. व्ही. रासवे यांनी परिपत्रकाद्वारे दिली.
विद्यापीठाकडून मिळालेल्या मान्यतेनुसार सीओईपीच्या स्थापत्य अभियांत्रिकी (सिव्हिल इंजिनिअरिंग), उत्पादनशास्त्र आणि अभियांत्रिकी आणि संगणक अभियांत्रिकी या तीन अभ्यासक्रमांना, तर पीसीओईच्या संगणक अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला मान्यता देण्यात आली आहे.
संगणक अभियांत्रिकी (बी.टेक.) हा अभ्यासक्रम मराठीतून तयार के ला आहे. ग्रामीण भागातील काही विद्यार्थ्यांना इंग्रजीची भीती वाटते. अशा विद्यार्थ्यांना आता मराठीतून अभियांत्रिकी अभ्यासक्रम करता येईल. मराठी अभ्यासक्रमासाठी एकू ण ६० जागांची स्वतंत्र तुकडी असेल. अभ्यास साहित्यासाठी समिती तयार करण्यात आली आहे. एआयसीटीई, राज्य शासनाकडून मान्यता मिळाल्यास यंदापासून प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येईल.
– डॉ. गिरीश देसाई, कार्यकारी संचालक, पिंपरी चिंचवड एज्युके शन ट्रस्ट
विद्यापीठाकडून अभ्यासक्रमांना मान्यता मिळाली आहे. पण सीओईपीचा अभ्यासक्रम विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांपेक्षा वेगळा आहे. त्यामुळे आधी अभ्यास साहित्याची निर्मिती करून पुढील वर्षीपासून प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया राबवण्याचा निर्णय महाविद्यालयाच्या नियामक मंडळाने घेतला आहे. उत्पादनशास्त्र आणि अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी या अभ्यासक्रमांना विद्यापीठाने मान्यता दिली आहे. मात्र त्याऐवजी विद्युत अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी विद्यापीठाकडे मान्यता मागितली आहे.
– डॉ. भारतकु मार आहुजा, संचालक, सीओईपी