Sunday, May 17, 2026
Homeआरोग्यविषयकपिंपरी चिंचवड महापालिकेच्या सफाई कर्मचा-यांच्या पात्र वारसाला आता लाड-पागे किंवा अनुकंपा धोरण...

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सफाई कर्मचा-यांच्या पात्र वारसाला आता लाड-पागे किंवा अनुकंपा धोरण यापैकी एक लाभ दिला जाणार

सेवेत कार्यरत असताना मृत्यू पावलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कायम आस्थापनेवरील सफाई कर्मचा-यांच्या पात्र वारसाला लाड-पागे समितीच्या शिफारशी अथवा अनुकंपा धोरण यापैकी एक लाभ देण्याबाबत आयुक्त शेखर सिंह यांच्या स्वाक्षरीने सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रक जारी केले असून त्याबद्दल सर्व विभागांना अवगत करण्यात आले आहे.

महापालिकेचे सफाई कर्मचारी शहराची स्वच्छता आणि शहराचे आरोग्य संवर्धन करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावतात. शहराचे सौंदर्य आणि नागरिकांचे आरोग्य चिरंतर टिकून रहावे यासाठी त्यांचे कार्य महत्वपूर्ण आहे. महापालिका सेवेत कार्यरत असलेल्या या कर्मचा-यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबास आता लाड-पागे किंवा अनुकंपा धोरण यापैकी एक लाभ दिला जाणार आहे.

शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडील निर्णयानुसार शासकीय सेवेत कार्यरत असताना दिवंगत कर्मचाऱ्यांच्या पात्र कुटुंबास अनुकंपा धोरणानुसार वारस नियुक्ती देण्याची तरतूद आहे. तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या परिपत्रकानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आस्थापनेवर कार्यरत असताना मयत झालेल्या सफाई कर्मचा-यांच्या पात्र वारसास लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार वारस नियुक्ती देण्याची प्रक्रिया करण्यात येते. परंतु मयत सफाई कर्मचाऱ्यांच्या पात्र कुटुंबास अनुकंपा तत्वावर वारस नियुक्ती देण्यात येत नव्हती. आता या धोरणात बदल करण्यात आला असून यापुढे सेवेत कार्यरत असताना दिवंगत झालेल्या सफाई संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसास नियुक्ती देताना लाड-पागे किंवा अनुकंपा धोरण यापैकी एक लाभ देण्यात येणार आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागामार्फत सर्व विभाग प्रमुखांना परिपत्रकाद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत.

शासनाद्वारे वेळोवेळी निर्गत केलेली परिपत्रके किंवा स्थायी आदेश महापालिकेमधील वारसा हक्क नियुक्ती प्रकरणात लागू राहतील असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. संबंधित विभागप्रमुखांनी आपल्या अधिनस्त सफाई संवर्गात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना या परिपत्रकाबाबत अवगत करावे तसेच सर्व विभागांनी परिपत्रकानुसार वारस नियुक्ती प्रकरणी कार्यवाही करावी, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments