महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर आज निकाल जाहीर करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने याबाबत अतिशय मोठा आणि ऐतिहासिक असा निर्णय दिला आहे. या निकालात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचा मोठा पराभव झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ चिन्ह देण्यात आलं आहे. अजित पवार गटासाठी हा सर्वात मोठा दिलासा आहे. अजित पवार यांना आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच मिळाला आहे. दुसरीकडे आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने विशेष मुभा दिली आहे. शरद पवार गटाला आता निवडणूक आयोगाला नव्या चिन्हाचा प्रस्ताव पाठवावा लागणार आहे.
जो न्याय शिवसेनेच्या शिंदे गटाला तोच न्याय आता निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला दिला आहे. राष्ट्रवादीचे चिन्ह आणि पक्षाचा निकाल हा अजित पवार गटाच्या बाजूने लागला असून हा शरद पवार गटाला मोठा धक्का असल्याचं मानलं जातंय. त्यामुळे येत्या निवडणुकीत शरद पवार गटाला वेगळ्या चिन्हावर आणि नावावर निवडणूक लढवावी लागेल हे स्पष्ट झालंय.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली होती. त्यामुळे खरा पक्ष कोणता याबाबतचा निकाल निवडणूक आयोगाकडे होता. हा निकाल आता लागला असून अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. पीटीआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.