द्वेषपूर्ण भाषण आणि चुकीचा संदेश दिल्याचा आरोप झाल्यानंतर निवडणूक आयोगाने याची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्या भाषणाबद्दल नोटीस बजावली आहे. २९ एप्रिल सकाळी ११ वाजेपर्यंत भाजपा आणि काँग्रेसला या नोटिशीला उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. भाजपा आणि काँग्रेसने एकमेकांवर आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी धर्म, जात, समाज आणि भाषेच्या मुद्द्यावर वादग्रस्त विधान केल्याचा आरोप केला होता.
निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम ७७ अनुसार दोन्ही पक्षाच्या अध्यक्षांना उत्तर देण्यास सांगितले आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदी तर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राहुल गांधींच्या भाषणावर आक्षेप घेत आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता.
निवडणूक आयोगाने दिलेल्या निवेदनात म्हटले की, राजकीय पक्षांनी आणि त्यांच्या स्टार प्रचारकांनी आपल्या उमेदवारांचा प्रचार करत असताना त्याची पूर्ण जबाबदारी घेतली पाहीजे. उच्च पदस्थ नेत्यांच्या भाषणांचे गंभीर परिणाम होऊ शकतात.
सोमवारी (दि. २२ एप्रिल) भाजपाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भाषणावर आक्षेप घेतला. देशात गरिबी वाढल्याचा दावा राहुल गांधी आपल्या भाषणातून करत आहेत, या दाव्यावर आक्षेप घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी भाजपाने निवडणूक आयोगाकडे केली आहे.