Wednesday, July 15, 2026
Homeताजी बातमीपिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे पालखी आगमनाची जय्यत तयारी , महापालिका आयुक्त डॉ. विजय...

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे पालखी आगमनाची जय्यत तयारी , महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतला आढावा

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून पालखी मार्गाची आणि विविध विसावा ठिकाणांची महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली. भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये आणि पालखी सोहळा अधिक शिस्तबद्ध व सुरळीत पार पडावा, या उद्देशाने आयुक्तांनी संबंधित विभागांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. या पाहणी दौऱ्यावेळी अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, उपायुक्त अण्णा बोदडे, मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे,सहशहर अभियंता बापू गायकवाड,प्रभाग अधिकारी अतुल पाटील, निवेदिता घार्गे, कार्यकारी अभियंता शिवाजी चौरे, वैशाली ननावरे, कार्यकारी अभियंता विजय भोजने, उमेश मोने यांच्यासह महापालिकेचे विविध विभागप्रमुख व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सकाळी भक्ती-शक्ती चौकातून या पाहणीला सुरुवात झाली. यावेळी महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या स्वागत कक्षाची पाहणी करून मेट्रोच्या कामामुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. त्यानंतर विठ्ठलवाडी येथील हनुमान मंदिर व विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरातील पालखी तळ, दर्शन रांग आणि मंडप व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. मार्गावरील अनधिकृत टपऱ्या आणि रस्त्यांवर येणाऱ्या लहान व्यावसायिकांमुळे भाविकांना अडथळा निर्माण होऊ नये, याची विशेष खबरदारी घेण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

दरम्यान पालखी विसावा ठिकाणाची पाहणी करताना आयुक्तांनी मेट्रो कामाचे लावलेले बॅरिकेड्स हटवण्यासोबतच प्रकाश व्यवस्था आणि वैद्यकीय सुविधा चोख ठेवण्याच्या सूचना दिल्या. पावसाळ्याचा विचार करता मैदानावर चिखल होऊ नये म्हणून तात्काळ खडी टाकण्याचे आणि शुद्ध पाणीपुरवठा सुनिश्चित करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. यानंतर आकुर्डीतील खंडोबा चौकात मेट्रोच्या सुरू असलेल्या कामांमुळे पालखीला अडथळा येणार नाही याची खातरजमा करून, रस्त्यांची दुरुस्ती करणे आणि झाडांच्या फांद्या छाटणे आदी कामे तातडीने पूर्ण करण्याबाबत सूचित केले. 

तसेच दापोडी येथील संत तुकाराम महाराज पालखी विसावा स्थळाची पाहणी करून आयुक्तांनी समाधान व्यक्त करत आवश्यक त्या सुधारणांचे आदेश दिले. पालखी सोहळा हा भाविकांच्या श्रद्धेचा विषय असल्याने, महापालिकेने आरोग्य, स्वच्छता, सुरक्षा या सर्व सुविधा वेळेत पूर्ण करण्यावर भर द्यावा, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments