Wednesday, January 22, 2025
Homeताजी बातमीसोसायटीधारकांचे राष्ट्रवादीमार्फत प्रश्न सुटणार असल्याने एकनाथरावांना पोटशूळ राष्ट्रवादीचे शहर प्रवक्ते विनायक रणसुभे...

सोसायटीधारकांचे राष्ट्रवादीमार्फत प्रश्न सुटणार असल्याने एकनाथरावांना पोटशूळ राष्ट्रवादीचे शहर प्रवक्ते विनायक रणसुभे यांची टीका

शहरातील सोसायटीधारकांचे प्रश्‍न सुटावेत, या प्रामाणिक हेतूने शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने “संवाद सोसायटीधारकांशी” हा अभिनव असा उपक्रम राबविण्यात येत आहे. मात्र, सोसायटीधारकांचे प्रश्‍न सुटूच नयेत, त्याचे केवळ राजकारण करावे, आणि त्या प्रश्‍नांवर सत्ता मिळवावी, या अपेक्षेने झपाटलेल्या एकनाथ पवारांना पोटशूळ का झाला? असा खरमरीत सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर प्रवक्ते विनायक रणसुभे यांनी भाजपच्या एकनाथ पवार यांना केला आहे.

शहरातील सोसायटीधारकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार सोसायटीधारकांशी उद्या (बुधवार) रोजी थेरगाव येथे संवाद साधणार आहेत. “संवाद सोसायटीधारकांशी” या कार्यक्रमावर भाजपचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार यांनी टीका केली होती. या टीकेला राष्ट्रवादीचे शहर प्रवक्ते रणसुभे यांनी प्रसिध्दी पत्रक काढून सडेतोड उत्तर दिले आहे.

प्रवक्ते रणसुभे म्हणाले, भारतीय जनता पक्षाची केंद्रात 8 वर्ष सत्ता असून राज्यात आणि पिंपरी महापालिकेत प्रत्येकी पाच वर्ष सत्ता होती. त्यामुळे सर्वत्र सत्ता भोगलेल्या भाजपवाल्यांनी सोसायटीधारकांचे प्रश्‍न सोडविले नाहीत, म्हणूनच शहर राष्ट्रवादीच्या वतीने संवाद सोसायटीधारकांशी हा विधायक असा उपक्रम राबविण्यात येत आहे. राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या माध्यमातून सोसायटीधारकांचे प्रश्‍न सोडविण्यात येणार आहेत, यात एकनाथ पवारांना दुःख होण्याचे कारण काय? पालिकेतील पाच वर्षांच्या सत्ता काळात लाचखोरी, खंडणीखोरी, भ्रष्टाचार करून स्वताःची घरे भरणाऱ्या भाजपवाल्यांनी टीका करण्याऐवजी आत्मपरिक्षण करावे. भाजपच्या भ्रष्ट राजवटीला कंटाळलेली जनता आगामी महापालिका निवडणुकीत थारा देणार नाही. त्यामुळेच पाया खालची वाळू घसरलेल्या भाजपायींना केवळ सत्ता हवी आहे, म्हणूनच एकनाथरावांच्या माध्यमातून टीका-टिपण्णी केली जात आहे.

भ्रष्ट कारभार, अंतर्गत कलह, ठेकेदार, बांधकाम व्यावसायिकांशी भाजप नेत्यांचे असलेले मधूर संबंधामुळेच सोसायटीधारकांवर आजची वेळ आल्याचा आरोप करत रणसुभे म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा सर्वसामान्य जनतेला बांधिल असलेला पक्ष आहे. सोसायटीधारकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत. तसेच येत्या पालिका निवडणुकीत सोसायटीधारक आणि सर्वसामान्य जनता भाजपला धडा शिकवेल, असेही रणसुभे यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments